नायगावचे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय नावालाच : अधिकारी आणि कर्मचारी बेपत्ता

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : भ्रष्टाचारासाठी सुप्रसिद्ध असलेले सामाजिक वनीकरण विभागाचे परिक्षेत्र कार्यालय हे नेहमीच अडगळीच्या ठिकाणी असते. पण नायगावचे परिक्षेत्र कार्यालय मात्र नावालाच असून. कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतल्यानंतर केवळ एक बोर्ड लावण्यात आला परंतु आजपर्यंत हे कार्यालय कधीच उघडला नाही. त्यामुळे हे कार्यालय नावापुरतेच असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे नायगावसह बिलोली व धर्माबाद तालुक्याचे कार्यालय बिलोली येथे होते तीन चार वर्षापूर्वी बिलोली कार्यालयाचे विभाजन होवून प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालय अस्तित्वात आले. त्यानंतरही काहीदिवस नायगाव वनपरिक्षेत्र कार्यालय बिलोलीला तर अधिकारी आणि कर्मचारी नांदेडला असा पायंडा पडला होता. वास्तविक या कार्यालयाचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख रहावा असा शासनाचा प्रयत्न असून याच कार्यालयाच्या माध्यमातून वनसंपदा निर्माण करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते.
मात्र या कार्यालयाचे अधिकारी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार तर करतच नाहीत पण नागरिकांना त्यांचे कार्यालय कुठे आहे याचाही थांगपत्ता लागू देत नाहीत. कारण कार्यालय हे नागरीकांना सोईच्या ठिकाणी असेल तर नागरिक कार्यालयात येतील याच उद्देशाने वनपरिक्षेत्र कार्यालय हे अडगळीच्या ठिकाणी असते.
नायगाव वनपरिक्षेत्र कार्यालयही असेच अडगळीच्या ठिकाणी असून बेटकबिलोली रोडवरील एका शेडमध्ये नायगाव वनपरिक्षेत्राचे कार्यालय थाटण्यात आले आहे. परंतु ज्या दिवसापासून कार्यालय भाडेतत्वावर घेण्यात आले त्या दिवशी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय नायगाव असे बँनर लावण्यात आले. त्या दिवसानंतर सदरचे कार्यालय आजपर्यंत उघडे असल्याचे कुणीच पाहीले नाही.
सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांची कार्यालये अडगळीच्या ठिकाणी तर घेतातच पण नायगाव येथील कार्यालय हे केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून आले. शासकीय वेळेत सदरचे कार्यालय कवीच उघडत नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी बेपत्ताच असतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.