धान्य वितरणाचे ‘कमिशन’ देण्यासाठी ‘कमिशन’ घेणाऱ्या हदगावच्या महिला नायब तहसीलदार कऱ्हाळे चतुर्भूज

New Bharat Times नेटवर्क
हदगाव : धान्य वितरणाचे मिळालेले 57000 हजार कमिशन देण्यासाठी 20 टक्के मागितले व तडजोडी अंती 10 टक्के प्रमाणे 5700 रुपयाची मागणी करुन सदरची रक्कम कंत्राटी संगणक चालकाकडे देण्यास सांगितले. हदगाव तहसील कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक गोविंद आप्पाराव जाधव यांने पुरवठा निरिक्षण तथा नायब तहसीलदार श्रीमती सुमन संभाजी कऱ्हाळे यांच्यासाठी लाच स्विकारली. या लाच प्रकरणी दोघावरही गुन्हा नोंद करण्यात आला असून कऱ्हाळे यांना ताब्यात घेण्यात आले तर जाधव यास वैद्यकीय कारणास्तव नोटीसीवर सोडण्यात आले.
या प्रकरणातील तक्रारदार यांचेकडे हदगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकान असून त्यांनी मागील 4 महिन्यात जो धान्य पुरवठा झाला होता त्याचे कमिशन म्हणून 57000 मिळाले होते. त्याचबरोबर नोव्हेंबर महिण्याचे रेशन प्राप्त झाले असून पुरवठा निरीक्षक यांनी ते इ पॉज या मशीनवर अपलोड केले नाही ज्यामुळे पुढील रेशन वाटप करता येणार नव्हते. तसेच 27 नवीन लाभार्थी यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी दि. 18 रोजी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक सुमन कऱ्हाळे यांची तहसील कार्यालय हदगाव येथे जाऊन भेट घेतली.
तिथे त्यांनी त्यांचे कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून त्यांचे समक्ष तक्रारदार यांना माहे नोव्हेंबर 2025 चे रेशन इ पॉज मशीनवर अपलोड करण्यासाठी व 27 नवीन लाभार्थ्यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी कमिशन पोटी शासनाकडून मिळालेले 57 हजार रुपये चे 20 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली व गोविंद जाधव यांनी देखील तीच मागणी केली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार यांनी दि. 20 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीची दि. 22 रोजी पडताळणी करण्यात आली. सापळा कारवाई दरम्यान पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी शासकीय पंचा समक्ष तडजोडीअंती कमिशनचे 10 टक्के प्रमाणे रुपये 5700 ची लाच मागणी करून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे लाच देण्यास सांगितले. पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्याकडे यांनी तक्रारदार यांचे कडून 5700 ची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवून कंत्राटी संगणक डेट एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे देण्यास सांगितली. तेव्हा कंत्राटी गोविंद जाधव यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतःसाठी व पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्यासाठी लाच स्वीकारली.
सदर लाच प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7, 7-अ, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपी कऱ्हाळे व जाधव यांची अंगझडतीत घेण्यात आली असून दोघांचे मोबाईल व ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपी सुमन कऱ्हाळे एक यांना ताब्यात घेण्यात आले असून कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव नोटीस वर सोडण्यात आले आहे.



