श्रीरामसागर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे त्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा- खा.रवींद्र चव्हाण
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : तेलंगणा राज्यातील श्रीरामसागर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव या सीमेलगतच्या तालुक्यांतील शेतकरी प्रचंड त्रस्त असून या शेतकऱ्यांना शासनाने भरीव अर्थ सहाय्य द्यावे अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. ते म्हणाले,
देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव तालुक्यात तेलंगणा राज्यातील श्रीराम सागर प्रकल्पाच्या बॅक वॉटरमूळे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दि.८ सप्टेंबरपासून कारेगाव फाटा येथे बॅक वॉटरमुळे त्रस्त शेतकरी साखळी उपोषणास बसलेले आहेत. धरणे आंदोलनही सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष डावलून भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा.रवींद्र चव्हाण यांनी या बैठकीत केली.
दि.२९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्ज नसेल त्या शेतकऱ्यांना तीन पट आर्थिक अनुदान द्यावे, असाही आग्रह खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी प्रशासनाकडे केला आहे.



