नांदेड येथे सीटीईटी परीक्षा केंद्र स्थापन करा ; खा.रवींद्र चव्हाण यांची केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : नांदेड येथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ( सीटीईटी)चे परीक्षा केंद्र स्थापन करण्याची मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांचे लक्ष वेधले. नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना होणाऱ्या अडचणी मांडल्या.खासदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे की, नांदेड येथील परीक्षार्थींना सध्या औरंगाबाद, हैदराबाद, छ. संभाजीनगर अशा दूरवरच्या ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागते. यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि महिला उमेदवारांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरते. त्यामुळे नांदेड येथेच सीटीईटीपरीक्षा केंद्र स्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे त्यांनी असेही नमूद केले की, नांदेडमध्ये परीक्षेसाठी आवश्यक ती यंत्रणा आणि शैक्षणिक अधिष्ठाने उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे परीक्षा केंद्र स्थापन केल्यास हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि अधिक परीक्षार्थींना परीक्षा देण्याची संधी प्राप्त होईल.
खासदार चव्हाण यांच्या या प्रयत्नामुळे नांदेड जिल्ह्यातील इच्छुक शिक्षक उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



