पाण्याअभावी डझनभर झाडे सुकली! नायगाव तहसील कार्यालयात शासनाच्या ‘झाडे लावा’ घोषणेला हरताळ
साहेबांच्या केबिनमध्ये कुलरची थंड हवा, मात्र आवारातील झाडांना पाण्याचा एक थेंबही मिळेना; सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांमधून तीव्र संताप

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- शासन एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी घोषणा देत वृक्षारोपणाच्या गप्पा मारत आहे. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे नायगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील डझनभर झाडे पाण्याअभावी जळून खाक झाली आहेत. कधीकाळी निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण असलेले तहसील कार्यालय आज अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ‘सुक्या काड्यांचे वाळवंट’ बनले असून, शासनाच्या घोषणेला येथे प्रशासनानेच हरताळ फाडल्याचे चित्र आहे.

काही वर्षांपूर्वी नायगाव तहसील कार्यालयाचा परिसर अत्यंत हिरवागार आणि थंड हवेशीर होता. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आलो असल्याचा भास व्हायचा. मात्र, गेल्या दीड वर्षात येथील चित्र पूर्णपणे पालटले आहे. गेल्या वर्षी प्रशासनाने टँकरने पाणी पुरवून काही दिवस झाडे जगवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यंदा तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या झाडांकडे पूर्णपणे कानाडोळा केला. परिणामी, उन्हाच्या तीव्र झळांमुळे डझनभर झाडांची पानेच नव्हे, तर मुळेही वाळून गेली आहेत.

एकेकाळी तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेऊन झेंडावंदनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले होते. आज तीच झाडे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि सामान्य नागरिकांना मायेची सावली देण्याऐवजी मृत पावली आहेत. “हीच झाडे जर अधिकाऱ्यांच्या घराच्या अंगणात असती, तर त्यांनी वेळोवेळी काळजी घेतली असती. पण सरकारी जागा म्हणजे बेवारस, अशीच वृत्ती प्रशासनाने दाखवली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.

सध्या उन्हाळ्याचा पारा ४३ अंशांच्या वर गेला आहे. अशा कडक उन्हात तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनात कुलर आणि पंख्यांची थंड हवा सुरू असते. मात्र, बाहेरील झाडांना हक्काचे पाणीही दिले जात नाही. कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे, तिथे झाडांकडे कोण लक्ष देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

शासकीय कार्यालयातच झाडे जगवली जात नसतील, तर सर्वसामान्यांना कोणता संदेश दिला जात आहे? ही प्रशासनाची शुद्ध अनास्था असल्याची तीव्र टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा आदेश फक्त कागदावरच राहिला असून, नायगाव तहसीलदारांच्या कृतीतून तो फोल ठरल्याचे उघड झाले आहे.
या वाळलेल्या झाडांना जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक विचारत असून, प्रशासनाने तातडीने पाण्याची व्यवस्था करावी आणि या जागेवर नवीन वृक्षारोपण करून ती झाडे जगवावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



