सुप्रभात मित्रमंडळाकडून लेंडी पुरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप

अंकुशकुमार देगावकर
मुखेड : तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील हसनाळ(पमु), भिंगोली, भेडेगांव, रावणगांव, मारजवाडी, भासवाडी व सांगवी(भा.) या गावासह परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने हाहाकार उडाला आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे मुखेड शहरात सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीने आज हासनाळ(पदे) या गावात जावून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना १२५ अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले.
ढगफुटी सद्रश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील काही गावात पुराच्या पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे गावकऱ्यांना जिव वाचविण्याच्या आकांताने आपल्या घरातील सर्व साहित्य सोडून अन्य ठिकाणी आसरा घ्यावा लागला. घरात शिरलेल्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उघडे पडले. अशा निराधार झालेल्या लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करणे आपले आद्य कर्तव्य आहे. याच हेतूने मुखेड शहरात सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीने आज हासनाळ(पदे) या गावात जावून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना १२५ अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले.
यावेळी सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवन कवटिकवार, कार्याध्यक्ष डॉ.दिलीप पुंडे, डॉ.आर.जी.स्वामी, संघटक अशोक कोत्तावार, नंदकुमार मडगुलवार, शिवाजी कोनापूरे, बालाजी वट्टमवार, मनोज जाजू, उत्तमराव कुलकर्णी, सतिष देबडवार यांनी प्रत्यक्ष जावून किटचे वाटप केले.
तसेच डॉ.एम.जे.इंगोले, डॉ.पी.बी.सीतानगरे, डॉ.एस.एन. कोडगिरे, डॉ.वीरभद्र हिमगिरे, लक्ष्मीकांत चौधरी, दादाराव आगलावे, दिनेश चौधरी, प्रवीण कवटीकवार, बिलोलीकर सर आदी सर्व सदस्यांनी आर्थिक सहकार्य केले. या भागातील नागरिकांना आता वैद्यकीय सेवा, विज, स्वच्छ पिण्याचे पाणी, उबदार कपडे, खाण्यासाठी तयार असलेले खाद्य, खिचडी, पोहे, तसेच पॅकिंग केलेले फराळाचे साहित्याची गरज असल्याचे दिसून आले.
दरम्यान डॉ.दिलीप पुंडे पूरग्रस्तांना भेटायला आल्याचे समजताच तेथेही त्यांना दाखविण्यासाठी लोकांनी गर्दी चालू केली. या महापुरात काही जणांना काहीतरी चावल्याचा भास झाला होता त्यामुळे आपली तब्येत दाखवून सल्ला विचारला. त्यावेळी डॉ.पुंडे साहेबांनी सर्वांना दिलासा देऊन दवाखान्यात येऊन मोफत उपचार करुन घेण्याचे आवाहन केले. तसेच आपण सर्वांनी आमच्या संकटात धावून येवून मदत केल्याबद्दल गावक-यांच्या वतीने त्र्यंबक उर्फ भाऊसाहेब पाटील हसनाळकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



