हुस्सा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :– नायगाव तालुक्यातील हुस्सा येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील महामानवांच्या प्रतिमांना अज्ञात व्यक्तीने आग लावून विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, कुंटूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुस्सा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती प्रतिमेसह इतर महापुरुषांच्या प्रतिमा, ध्वज, पताके, खुर्च्या आणि सत्रंजी या वस्तूंना आग लावली. मंदिरातून धूर येत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझविली, परंतु तोपर्यंत महापुरुषांच्या प्रतिमा व इतर साहित्य जळून खाक झाले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने अनुसूचित जातीतील नागरिकांच्या भावना तीव्र दुखावल्या असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
फिर्यादी व समाज बांधवांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९८ आणि ३२४ (४) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशयुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सध्या दलित वस्तीमध्ये रस्त्याचे काम सुरू असून तिथे कंत्राटदाराचे साहित्य ठेवलेले होते. याच परिस्थितीचा फायदा घेत समाजकंटकाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



