कुंडलवाडी शहरात ‘श्री’ विसर्जनासाठी प्रशासन सज्ज ◆ नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण◆ डीजे मुक्त गणेश विसर्जनावर प्रशासनाचा भर
◆ २५ जणांना श्री विसर्जन दिवशी केले स्थानबद्ध ◆ २ पोलीस अधिकारी ५० कर्मचारी व एक राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- येथील नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाने शनिवार दि.६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. विसर्जन शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन स्थळी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून तसेच पोलिसांचाही चोख बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आला असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक प्रवीण श्रुंगारे यांनी दिली आहे.
कुंडलवाडी शहरात श्रींची स्थापना करून ११ दिवस मोठ्या भक्ती भावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शनिवार ६ सप्टेंबर रोजी शहरातील ४५ व ग्रामीण भागातील गुजरी येथील एक, अर्जापूर येथील २ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात उद्या होणाऱ्या विसर्जनापैकी ४८ गणेश मंडळांनी डीजे मुक्त गणेश विसर्जन करण्याचे हमीपत्र पोलीस प्रशासनाला दिले असून श्री विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी शहर व परिसरातील २५ जणांना श्री विसर्जन दिवशी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
श्री विसर्जन शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुंडलवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त नियुक्त केला असून यासाठी २ पोलीस अधिकारी, २६ पोलीस कर्मचारी, २४ गृह रक्षक दलाचे जवान व राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली असून कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील ८५ सर्व गणेश मंडळांनी डीजे मुक्त विसर्जन करण्याचे हमीपत्र पोलीस प्रशासनाला दिली आहे. गुलाला ऐवजी फुलांची उधळण करण्यासाठी पोलीस ठाण्याकडून फुले ही गणेश मंडळाला देण्यात येणार असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
कुंडलवाडी नगरपरिषदेकडूनही श्री विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी अग्निशमन दल व कुंडलवाडी नगरपालिकेचे कर्मचारी पूर्ण तयारीनिशी सज्ज असून विसर्जन घाटाची स्वच्छता व विसर्जन स्थळी पाणी, लाईट व इतर सुविधांची व्यवस्था तसेच विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत व विसर्जन स्थळी भोर तलावाच्या ठिकाणी सर्व सुविधानी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक प्रवीण श्रुंगारे यांनी दिली आहे.



