गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणामध्ये अहोरात्र झटणाऱ्या कुंडलवाडी पोलीसांचे कौतुक
◆पोलिसांची सजगता ◆गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत

कुंडलवाडी :- शहर व परिसरात गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून सण, उत्सवांचा माहोल पाहावयास मिळत होता. गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशी आणि १० सप्टेंबर रोजी साजरी झालेली ईद-ए- मिलाद यानिमित्त विविध भागांतून निघालेला जुलूस अन् विसर्जन मिरवणूक यामुळे पोलिस दल सलग बारा ते पंधरा दिवस ऑनड्यूटी होते. गणेश उत्सवाचे अकरा दिवस पोलिसांना साप्ताहिक सुटीदेखील घेता आली नाही. पोलिसांमुळे दोन्ही धर्मीयांचे मोठे सण कुंडलवाडी शहरात पारंपरिक पद्धतीने शांततेत पार पडले.
गणेशोत्सवाच्या औचित्यावर बैठका घेणे, मंडळांशी संवाद साधणे, परवानग्या देणे, बंदोबस्ताचे नियोजन, प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये कुंडलवाडी पोलिस दल व्यस्त होते. यामुळे गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण झाला. त्यामुळे अनेक गुन्हे कमी झाले होते.गणेशोत्सव ईद-ए-मिलाद या सण उत्सवाच्या काळात कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवान व राज्य राखीव दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवून हिंदू व मुस्लिम धर्मियांचे सण उत्सव मोठ्या आनंदात व शांततेत पार पाडले.
कुंडलवाडी शहरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन मोठे सण आनंदात साजरे झाले. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे साप्ताहिक सुट्टी मिळाली नसली तरी अहोरात्र सणव उत्सवाच्या काळात जनतेची रक्षा करणाऱ्या व सण आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे कुंडलवाडी पोलिसांचे शहर व परिसरातून कौतुक होत आहे.



