दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
◆ बैठकीत गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे आज दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आगामी काळातील दुर्गा महोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत कुंडलवाडी पोलीस स्टेशन तर्फे गणेशोत्सवात गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ उत्तरवार, माजी नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे, कुंडलवाडी शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुणाल पवारे, पत्रकार एन.जी.वाघमोडे, कल्याण गायकवाड महंमद अफजल, डॉ.माधव हळदेकर, सायरेड्डी ठक्कुरवार, डॉ.नरेश बोधनकर, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर आदीजन यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. गणेश विसर्जन शांततेत व डीजे मुक्त साजरा करून शहरवासीयांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केले. त्याचप्रमाणे दुर्गा विसर्जन ही शांततेत व डीजेमुक्त साजरा करावे.शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात ७ असे एकूण ४० दुर्गादेवींची स्थापना होणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी यावेळी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आगामी काळातील दुर्गा महोत्सव साजरी करावे असे आवाहन केले.
गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम श्री भक्ती गणेश मंडळ, द्वितीय श्री विद्यार्थी गणेश मंडळ, तृतीय श्री स्वराज्य गणेश मंडळ व उत्तेजनार्थ प्रथम श्री संगमेश्वर गणेश मंडळ, द्वितीय श्री वंजारी समाज सार्वजनिक गणेश मंडळ व तृतीय श्री बाळ गणेश मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. चिरली, टाकळी (थडी), डौर, माष्टी, शेळगाव (थडी), संगम, मनुर, नागणी, कोटग्याळ, ममदापूर, दौलापुर, काऱ्हाळा, गुजरी, सुलतानपूर, हरनाळी, विळेगाव (थडी)या १५ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला.
गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक तसेच एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आलेल्या १५ गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व तसेच या उपक्रमात काम केलेले परीक्षकांचा व नुकतेच पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार दि.१८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.



