ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

“संशोधक विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा

New Bharat Times नेटवर्क

पुणे :- राज्यातील कृषी विद्यापीठांसह विविध विद्यापीठांमधील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी अधिछात्रवृत्ती व फेलोशिपच्या तातडीच्या मागणीसाठी पुण्यात मोठा आक्रोश मोर्चा काढला असून,“शिक्षण चालू ठेवायचंच – शिष्यवृत्ती द्या” अशा घोषणांनी आज पुण्याच्या डेक्कन परिसर दुमदुमला.

हा मोर्चा 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून निघाला. मार्गात कृषी महाविद्यालय व सीओईपी कॉलेजमार्गे विद्यार्थ्यांची रॅली पुढे सरकत गुडलक चौक, डेक्कन येथे संपली. हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू असून विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे की “शासनाने अधिछात्रवृत्ती व फेलोशिपची जाहिरात प्रसिद्ध करून तातडीने लाभ वितरित करेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.

सन 2018-19 पासून सर्व पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना विविध संस्थामार्फत अधिछात्रवृत्ती नियमितपणे दिली जात होती. या शिष्यवृत्तीमुळे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह खर्च, पुस्तके, स्टेशनरी व दैनंदिन खर्च भागवला जात होता. याच आर्थिक मदतीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनावर लक्ष केंद्रित करता येत होते.

मात्र, 2023-24 पासून अर्ज मागविणे आणि निधी वितरित करणे थांबले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अपूर्ण सोडण्याची वेळ आली आहे. “याचा थेट परिणाम संशोधनाच्या गुणवत्तेवर होत असून राज्यातील उच्च शिक्षण व कृषी संशोधन धोक्यात आले आहे,” असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात संशोधक विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे.

सन 2023-24 व 2024-25 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत, आर्टी या सर्व संस्थांच्या जाहिराती तातडीने प्रसिद्ध कराव्यात. नोंदणी दिनांकापासून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करावी तसेच संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी. थकित व प्रलंबित फेलोशिप तातडीने वितरित करावी. अमृत संस्थांतर्गत लिंगायत पीएच.डी. विद्यार्थ्यांना त्वरित समाविष्ट करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुणेकरांना विद्यार्थ्यांचा साद :
कृषी पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी थेट पुणेकरांना भावनिक आवाहन केले आहे. विद्यार्थी पावसात, उन्हात, थंडीमध्ये रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. “विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,” अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.

पावसात, उन्हात आणि आर्थिक संकटात तग धरून उभे असलेले संशोधक विद्यार्थी केवळ आपल्यासाठीच नव्हे तर समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहेत. जर शासनाने तातडीने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker