कुंडलवाडी नगरपरिषदे सदस्यांची आरक्षण सोडत आज ◆ इच्छुकांची उत्सुकता शिगेला

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषदेची मुदत समाप्त होऊन साडेतीन वर्षाचा कालावधी झाला आहे. निवडणूक कधी लागणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. यातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले. यानंतर निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू झाले. कुंडलवाडी नगराध्यक्ष पद हे खुला(ओपन) सर्वसाधारण साठी सुटल्यानंतर नगरसेवक पदाचे आरक्षण सोडत आज दि.८ आँक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कुंडलवाडी नगरपरिषद कार्यालयात उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कुंडलवाडी नगरपरिषदेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. डिसेंबर २०२१ मध्ये पाच वर्ष पुर्ण झाले. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अध्यक्षासह सदस्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला. यानंतर बिलोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रशासक म्हणून गत साडे तीन वर्षापासून शासनाने नियुक्ती केली आहे. गत महिन्यात ३० सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
अनु.जाती, अनु.जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे १० प्रभागातील २० सदस्यांसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी हि ८ आँक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना १३ आँक्टोबर पर्यंत दाखल करता येणार आहेत. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन दि.२८ आँक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि.७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. तसेच सदस्यांचे आरक्षण सोडत व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिवाळीनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढण्यास सुरूवात झाली आहे.



