पंचायत समितीच्या आरक्षणात प्रस्थापितांना संधी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार नायगाव पंचायत समितीच्या ८ गणाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी बरबडा, देगाव, मुगाव, टेंभुर्णी गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर कुंटूर आणि नरसी अनु. जाती (महिला), कुंटूर व मांजरम ओबीसी साठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या चारही गटात प्रस्थापितांना धक्का बसल्यानंतर पंचायत समितीच्या आरक्षणात संधी मिळाली आहे.
नायगांव तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण पुरुषासाठी गण मुगांव, टेंभुर्णी व सर्वसाधारण महिलांसाठी बरबडा, देगांव तर अनुसूचित जाती पुरुषांसाठी कृष्णूर, महिलेसाठी नरसी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पुरुषांसाठी मांजरम व महिलांसाठी कुंटूर हे गण आरक्षित करण्यात आले. या आरक्षण यादीनुसार महिलांना एकूण चार गण आरक्षित झाले आहेत जे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे आरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, अनु.जाती इतर मागासवर्गीय घटकांनाही प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे सर्व समाजघटकांना स्थान मिळवून देणारे आरक्षण झाले.
या आरक्षण सोडतीच्या बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायगांवच्या तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय येरावार हे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आरक्षणात नायगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषदेचे गट महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला होता. मात्र पंचायत समितीच्या आरक्षणात चार गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून दोन गण ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापितांना पंचायत समितीच्या मैदानात उतरण्यासाठी संधी मिळणार आहे.
तालुक्यातील राजकीय प्रतिनिधी म्हणून आवकाश धुप्पेकर, सरपंच माधव कोलगाणे, राजु बेळगे, परमेश्वर पा.धानोरकर, शिवराज वरवटे, युवराज लालवंडीकर, अवकाश धुप्पेकर, रामदास पा.भाकरे, अफरोज चौधरी यांची उपस्थिती होती. नायगांव पंचायत समितीच्या या आठ गणांतील आरक्षणामुळे सामाजिक समरसता जपली गेली असून, लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेची कोणत्या उमेदवारांवर पसंती ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नायगाव तालुक्यातील मांजरम व कुंटूर हे पंचायत समितीचे गण ओबीसी साठी आरक्षित झाले. आता मराठा समाजालही ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक प्रमाणपत्रधारक निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. परिणामी या दोन गणातील लढतो चुरशीच्या तर होतीलच पण जुन्या व नव्या ओबीसीत संघर्ष अटळ आहे.



