कुंडलवाडी पोलीस ठाण्यातर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत श्री भक्ती गणेश मंडळ प्रथम
◆विजेत्या गणेश मंडळांना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाणे तर्फे गणेशोत्सवात गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या गणेश मंडळांना दि.१८ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन, नांदेड येथे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवा दरम्यान सामाजिक उपक्रम व शिस्तबद्धतेसाठी प्रोत्साहन म्हणून सार्वजनिक गणेश मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील ८७ गणेश मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम श्री भक्ती गणेश मंडळ, द्वितीय श्री विद्यार्थी गणेश मंडळ, तृतीय श्री स्वराज्य गणेश मंडळ व उत्तेजनार्थ प्रथम श्री संगमेश्वर गणेश मंडळ, द्वितीय श्री वंजारी समाज सार्वजनिक गणेश मंडळ व तृतीय श्री बाळ गणेश मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. चिरली, टाकळी (थडी), डौर, माष्टी, शेळगाव (थडी), संगम, मनुर, नागणी, कोटग्याळ, ममदापूर, दौलापुर, काऱ्हाळा, गुजरी, सुलतानपूर, हरनाळी, विळेगाव (थडी) या १५ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला.
गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आलेल्या १५ गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व तसेच या उपक्रमात काम केलेले परीक्षक डॉ. नरेश बोधनकर, सायारेड्डी ठक्कुरवार, कल्याण गायकवाड, डॉ. माधव हळदेकर व नुकतेच पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार दि.१८ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, परीक्षक आदी जण यावेळी उपस्थित होते.



