डिवायएसपी अँक्शन मोडवर : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहणे पकडली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दि. 8 रोजी रात्री नायगाव तालुक्यात पकडल्या आहेत. दोन हायवासह 33 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक आणि मालकावर नायगाव व कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नायगाव तालुक्यात महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने वाळूचा गोरखधंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात एक वाळू घाट सुरु नसताना पोलीस व महसूल विभागाचे हात मजबूत करुन बिनदिक्कतपणे दिवसरात्र अवैध वाळूची वाहतूक सुरु आहे. हे माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांना समजल्यावर त्यांनी त्यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे व अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेवून दि. 8 रोजी नायगाव व कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघाले असता नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड रोडवरील माऊली पेट्रोल पंपाजवळ एम एच 03 सीपी 6921 हा टिप्पर दिसून आला.
सदरच्या टिप्परची चौकशी केली असता त्यात आडीच ब्रास वाळू होती व कुठलाही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे टिप्पर जप्त करुन नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला. त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतरगाव रोडवर बरबड्याजवळ एम एच 14/ एच यु 6455 या क्रमांकाचा हायवा सापडला. याचीही चौकशी केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचा हायवा ताब्यात घेवून कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला.
नायगाव व कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आलेला एक टिप्पर व एक हायवा असा एकूण 33 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन गोपीराज घोडीबा हंबर्डे टिप्पर चालक रा.वाका ता.लोहा जि.नांदेड मारोती अशोक पुरी व्यवसाय मुनिम रा.पेंबर ता. भोकर, पांडुरंग अवधुत कदम, चालक रा.शंकतीर्थ ता.मुदखेड व गणपती रघुनाथ कदम रा.शंकतीर्थ ता. मुदखेड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
अवैध वाळू वाहतुकीच्या विरुद्ध कडक कारवाई करणे हे महसूल विभागाचे काम असतांना महसूल विभाग फक्त तडजोडी करण्यात व्यस्त असल्याने पोलीस विभाग एक्शन मोडवर आला आहे.



