ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सहस्त्रकुंडच्या तीरावर रंगले सहस्र काव्यधारा संमेलन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : सहस्रकुंड या पर्यटन स्थळी मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडने आयोजित केलेल्या सहस्र काव्यधारा संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून मान्यवर कवींनी सदर केलेल्या काव्यधारांनी परिसर काव्यमय झाला होता. संवेदनशील लेखक कवी व्यंकटेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कवी संमेलनात नांदेड जिल्ह्यातील मान्यवर कवींनी हजेरी लावली होती.

मराठी वाचन चळवळीला बळकटी देता यावी, साहित्याची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारिणी सदस्य तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी, मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये नांदेड जिल्ह्यात मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार यांच्या संकल्पनेतून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

या अनुषंगानेच सहस्रकुंड येथे नुकतेच सहस्र काव्यधारा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार अनिल मादसवार यांनी केले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देवीदास फुलारी यांच्यासह बालकवी पंडित पाटील बेरळीकर, इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे, मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, कार्यवाह प्रा.महेश मोरे, उपाध्यक्ष दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यातील ज्या लेखक, साहित्यिकांना पुरस्कार मिळाले आहेत अशां मान्यवरांचा मसापच्या वतीने गौरवही करण्यात आला. यात लेखक देविदास तारू, कथाकार भारत दाढेल, रोहिणी पांडे, रुचिरा बेटकर, रूपाली वागरे आदी मान्यवरांचा समावेश आहे. उद्घाटन आणि सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे सह कार्यवाह, पत्रकार राम तरटे यांनी केले.

झुळझुळ वाहणाऱ्या पैनगंगेच्या तीरावर पार पडलेल्या सहस्र काव्यधारा संमेलनात रुचिरा बेटकर, अंजली मुनेश्वर, रूपाली वागरे, अमृत तेलंग, दत्ता वंजे, शंकर माने, जीवन मांजरमकर, रोहिणी पांडे, संतोष सुर्वे , मनीष परदेशी, प्रा.भरत वाघमारे, नम्रता खिल्लारे, माधव रहाटे, बालाजी पेठकर, प्रल्हाद घोरबांड, पंडित पाटील, बालाजी भागानगरे, अंजली हिंगोले, अर्चना चवणे,चंद्रकांत चव्हाण, मनीष परदेशी, प्रा.दत्तात्रय खडसे आदी.

मान्यवरांनी आपल्या काव्यरचना सादर करून सहस्र काव्यधारा संमेलन अधिक प्रवाही आणि संस्मरणीय केले. एकाहून एक सरस काव्य रचनांच्या सादरीकरणांनी मैफल बहरली होती. उपस्थितांनीही कवितांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. सहस्र काव्यधारा संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी श्रीनिवास मस्के यांनी केले तर आभार प्रा. महेश मोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker