बरबडा परिसरात अवैध वाळू वाहतुकीचे “रात्रीस खेळ चाले”..!! जड हायवामुळे नाली बांधकाम पुन्हा पडले

भगवान शेवाळे
बरबडा : नद्या, पर्यावरण आणि सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान करणारी अवैध वाळू वाहतूक ही समस्या अनेक गावांमध्ये वेगाने वाढत आहे. परवानगीशिवाय चालणारी ही वाहतूक केवळ नैसर्गिक संसाधनांची लूट करत नाही, तर यामुळे गावच्या रस्त्यांचे, नाल्यांचे आणि सार्वजनिक सुविधांचेही मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी केलेल्या “दिखाऊ”कारवाईनंतरही हा गोरखधंदा सुरूच असल्याने या दिखाऊ कारवाईवरच आता संशय निर्माण होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप वाढताना दिसत आहे.

शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजता बरबडा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका जड हायवाच्या भारामुळे नुकतेच तयार केलेले नाली बांधकाम दुसऱ्यांदा कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे वाळूने भरलेली ही गाडी गावात प्रवेश करत असताना नालीवरील स्लॅब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यालगतच्या एका घरासमोरील काँक्रीट बेडचेही गंभीर नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील हेच नाली बांधकाम अशाच प्रकारामुळे ढासळले होते. एका दुचाकीस्वाराला यामुळे गंभीर इजा देखील झाली होती. माध्यम प्रतिनिधींनी दखल घेताच हे ढासळलेल्या नाली कामावर स्लॅब टाकण्यात आले. त्यानंतरही असाच “प्रताप”या अवैधरीत्या होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे आता समोर आला आहे.

एकीकडे आमदार राजेश पवार हे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. नवीन नाली, रस्ते, पायाभूत सुविधा यांसारखी कामे वेगाने उभी राहत आहेत. परंतु दुसरीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे नुकत्याच पूर्ण झालेल्या विकासकामांचा अक्षरशः बट्ट्याबोळ होत आहे. त्यामुळे झालेल्या कामावरच आता संशय निर्माण होत आहे. परवानगीशिवाय सुरू असलेली ही वाहतूक रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढत असून,नियम डावलून चालणाऱ्या या वाहतुकीवर कठोर नियंत्रणाची गरज असल्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाची बघ्याची भूमिका…
गावात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे. नाल्या, कचरा, सांडपाणी हे उघड्यावर उघडपणे दिसून येत आहे. अनेक गंभीर समस्या दिसून येऊनही ग्रामपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्यामुळे यावर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याने अशा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला बळ मिळत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.



