शिवसेनेच्या ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ ब्रीदवाक्याशी निष्ठा ; प्रभाग ५ मधून मंगेश नारायण कदम यांची उमेदवारीची मागणी

जयवर्धन भोसीकर
नांदेड :- नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५, भाग्यनगर येथून अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गात शिवसेनेचे एससी–एसटी–ओबीसी जिल्हाप्रमुख मंगेश नारायण कदम यांनी रीतसर उमेदवारीची मागणी केली आहे.
शिवसेनेचे ब्रीदवाक्य असलेल्या “८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण” या तत्वज्ञानाशी निष्ठा राखत मंगेश कदम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजाभिमुख कार्यावर भर दिला आहे. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. विशेषतः अनुसूचित जाती–जमाती, दुर्बल घटक, युवक व महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान शिवसेनेचे पक्ष निरीक्षक व उपनेते श्री.हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री.बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार श्री.आनंदराव बोंढारकर, हदगाव–हिमायतनगरचे आमदार श्री.बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख श्री.गंगाधर बडुरे, उमेश मुंडे, विनय गिरडे पाटील, विवेक देशमुख तसेच संपर्कप्रमुख दत्तात्रय इबितवार यांनी मंगेश कदम यांची सविस्तर मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा, संघटनात्मक अनुभवाचा व प्रभागातील जनाधाराचा आढावा घेण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे, प्रभाग क्रमांक २ व ५ परिसरात मंगेश कदम यांनी यापूर्वी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळलेली असून, नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्न आणि युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
शिवसेना (शिंदे गट) ही केवळ सत्तेपुरती मर्यादित नसून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी चळवळ आहे, या भूमिकेवर पक्ष ठाम आहे. त्यामुळे नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंत, कार्यक्षम व समाजाशी नाळ जुळलेले कार्यकर्ते यांनाच संधी देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे चित्र या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. एकूणच, मंगेश नारायण कदम यांची उमेदवारी ही शिवसेनेच्या समाजाभिमुख राजकारणाचा चेहरा ठरू शकते, अशी भावना प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.



