माहूर–किनवट महामार्गावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर

New Bharat Times नेटवर्क
माहूर : किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी वाहन व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर चारचाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दि. 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात इतका जोराचा होता की धडकेनंतर दुचाकी शेकडो फूट दूर फेकली गेली.
माहूर येथील रहिवासी रुपेश गुलाबराव आराधे (वय २९) हे वाई बाजार येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको (क्रमांक एम.एच. २७ ए.आर. ९२१०) या वाहनाने गेले होते. परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली.
या अपघातात जयराम कोमल प्रसाद मिश्रा (वय ६०) रा. सायफळ, ता. माहूर) हे शाईन कंपनीच्या मोटरसायकलवर (क्रमांक एम.एच. २६ ए.जे. १५८९) प्रवास करत होते. भीषण धडकेमुळे जयराम मिश्रा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुपेश आराधे हे गंभीर जखमी झाले.
जखमी रुपेश आराधे यांना तात्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले.
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह व जखमीला रुग्णालयात हलवले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.



