कुंडलवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा ४८ तासात केला उघड
◆तीन आरोपीस अटक ◆दोन दिवसांची पोलीस कोठडी

कुंडलवाडी :- येथून जवळच असलेल्या पिंपळगाव (कुंं) येथील मोटरसायकल चोरी प्रकरणातील गुन्हा ४८ तासात उघड करून तीन आरोपींना मुद्देमालासह अटक केली असून तीनही आरोपींना बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्हि.आय.घोरपडे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिंपळगाव (कुं) येथील रहिवासी नागनाथ विठ्ठल भंडारे यांची मोटरसायकल क्र.एम.एच.२६ वाय ७१२४ हि दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पिंपळगाव शिवारातील शेतातून चोरीला गेली होती याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच कुंडलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित दि.१९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात गोपनीय माहिती मिळाल्यावरून पिंपळगाव (कुं) शिवारातून आरोपी बुधरत्न धम्मानंद रामटक्के (रा.हिंगणी ह.मु.पिंपळगाव कुं १९), लक्ष्मण माणिक जाधव (रा.पिंपळगाव कुं २१), वैभव प्रल्हाद होनपारखे (रा.पिंपळगाव कुं २६) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी पिंपळगाव(कुं) शिवारातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व आरोपीकडून चोरीस गेलेली मोटरसायकल कुंडलवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तिनही आरोपींना अटक करून बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्हि.आय.घोरपडे यांच्यासमोर उभे केले असता तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी कुंडलवाडी शहर व परिसरात आणखी मोटारसायकल चो-या केल्या आहेत का याबाबत तपास करीत आहेत.
हि कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ अर्जुन खनपटे, शिवराज गंगुलवार, ज्ञानेश्वर डाकेवाड यांनी केली आहे.



