ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

​’ऑपरेशन क्रॅकडाऊन’चा केवळ गाजावाजा ; बिलोलीत महसूल, पोलीस अन् आरटीओच्या आशीर्वादाने लाल रेतीची बेधडक अवैध वाहतूक!

सगळोलीत युवकाचा बळी जाऊनही प्रशासन सुस्त ; 'क्रॅकडाऊन' फक्त नावापुरतेच, जनतेचा संतप्त सवाल

प्रकाश महिपाळे

नांदेड :- नांदेड पोलीस प्रशासनातर्फे सध्या जिल्हाभर अवैध धंद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ राबवले जात असल्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. या मोहिमेचे फोटो आणि आकडेवारी प्रसिद्ध करून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) स्वतःची पाठ थापटून घेण्यात मग्न आहेत. मात्र, प्रशासनाचा हा दावा किती फोल आहे, याचे जिवंत उदाहरण बिलोली तालुक्यात पाहायला मिळत आहे. बिलोली तालुक्यात दररोज रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्राचे लचके तोडून लाल रेतीची ओव्हरलोड आणि अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. याकडे जिल्ह्यातील महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) साफ डोळेझाक करत असल्याने, “प्रशासनाने फक्त बिलोली तालुक्यालाच अवैध धंद्यांची सूट दिली आहे का?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच दिनांक १६ रोजी सगळोली येथील अनुसया नगर भागातील एका निष्पाप युवकाला या ओव्हरलोड आणि सुसाट धावणाऱ्या वाळूच्या वाहनाने चिरडले. यात त्या युवकाचा जागीच जीव गेला. या भीषण अपघातानंतर तरी सुस्त पडलेले प्रशासन जागे होईल, अवैध वाहतुकीला चाप बसेल आणि कायद्याची शिस्त लागेल, अशी अपेक्षा बिलोलीकरांना होती. मात्र, या दुर्दैवी घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. रात्रीच्या अंधारात अजूनही त्याच वेगाने, त्याच दादागिरीने ओव्हरलोड वाळूच्या गाड्या नागरिकांच्या जीवाशी खेळत धावत आहेत.

बिलोली तालुक्यातील नदीपात्रातून रेती उपशाचा काळा खेळ सुरू आहे. कोणत्याही नियमांची पर्वा न करता, सर्रासपणे जेसीबी मशीन लावून क्षमतेपेक्षा जास्त वाळू हायवा गाड्यांमध्ये भरली जाते. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून धावणाऱ्या या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्यांची चाळण तर झालीच आहे, शिवाय पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे.

तीन प्रमुख विभागांची संशयास्पद ‘डोळेझाक’…
या संपूर्ण काळ्या धंद्यामध्ये तीन प्रमुख शासकीय यंत्रणांच्या भूमिकेवर आता संशयाची सुई निर्माण झाली आहे.
महसूल प्रशासन: तालुक्यात कुठे उत्खनन होत आहे, याची पूर्ण माहिती असूनही महसूलचे अधिकारी कारवाईचे सोंग घेतात.
पोलीस प्रशासन: जिल्ह्यात ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’च्या नावाखाली जिल्हा भरात कारवाया बिलोली तालुका सोडून चालु आहेत. स्वतःची पाठ थापटून घेणारे पोलीस बिलोलीतील या मोठ्या रॅकेटवर हात टाकण्यास का घाबरत आहेत?
आरटीओ (RTO) विभाग: रस्त्यावरून धावणाऱ्या ओव्हरलोड गाड्या आरटीओ अधिकाऱ्यांना कधीच कशा दिसत नाहीत? की आर्थिक देवाणघेवाणीतून ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक केली जात आहे?

एकीकडे जिल्हाभर ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’चा ढोल बडवायचा आणि दुसरीकडे बिलोली तालुक्याला अवैध उपशासाठी मोकळे रान सोडून द्यायचे, हा कुठला न्याय? प्रशासनाने या माफियांसोबत हातमिळवणी केली आहे का?” अशी जाहीर चर्चा आता बिलोलीतील चौकाचौकांत रंगत आहे.

सगळोलीतील युवकाचा मृत्यू ही प्रशासकीय अनास्थेमुळे झालेली हत्याच आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. जर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना खरोखरच ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ यशस्वी करायचे असेल, तर त्यांनी बिलोलीतील या लाल रेतीच्या काळ्या बाजारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, जनतेचा तीव्र रोष आणि आंदोलनाचा सामना प्रशासनाला करावा लागेल, यात तीळमात्र शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker