वाळू तस्कर मुरलीधर ढगे एक वर्षासाठी स्थानबद्ध : हर्सूल कारागृहात रवानगी

प्रकाश महिपाळे
नायगाव : येळी ता.लोहा येथील टिप्पर चालक तथा वाळू तस्कर मुरलीधर प्रकाश ढगे यास उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठाकडे केली होती. त्यानुसार ढगे यास स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची एक वर्षासाठी हरसूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीस आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून सतत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान अवैध वाळू उपसा व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखणे आणि समाजातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मा.श्री.अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कठोर पावले उचलली आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यानुसार कायवाई करण्यात येत आहे.
सन 2025 या चालू वर्षामध्ये 37 सराईत गुन्हेगारास कारागृहामध्ये “स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर मा.श्री.अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सन 2024-2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे एकुण 165 गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. तसेच सन 2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे एकुण 35 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
येळी ता.लोहा येथील मुरलीधर प्रकाश ढगे हा दीर्घकाळापासून गोदावरी नदी पात्रातून वाळूची अवैधरित्या तस्करी करून चोरटी विक्री करत होता. त्याच्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे नदीपात्राचे अपरिवर्तनीय नुकसान, पर्यावरणीय असंतुलन तसेच परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. सदर व्यक्तीविरुद्ध पापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, तरीदेखील त्याने अवैध धंदे थांबविले नाही. त्याच्या या वारंवार करत असलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर व्यक्तीच्या अवैध कारवाया सार्वजनिक सुव्यवस्थेस विपरीत परिणाम करत असल्याने, सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोणातून सदर वाळू तस्कर मुरलीधर प्रकाश ढगे यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड अधिनियमा प्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव संजय निलपत्रेवार, सहा. पोलीस निरीक्षक, यांनी मा. पोलीस अधीक्षक, साहेब नांदेड यांचेकडे सादर केला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सदर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यानुसार प्रस्तावामधील मुरलीधर ढगे या गुन्हेगारास एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन राहुल कर्डिले जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील नमुद गुन्हेगारास एक वर्षाकरीता हासूल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबत दि. 31 डिसेंबर रोजी आदेश निर्गमीत केले आहेत. सदर वाळू तस्कर गुन्हेगारांस ताब्यात घेवून हार्मूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे बंद करण्यात आले असल्याची माहिती उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी दिली आहे.



