मुस्तापूरला बिबट्याने हरणाची केली शिकार : शेतकरी व नागरिकात भितीचे वातावरण

प्रकाश महिपाळे
नायगाव : जवळपास मागच्या एक महिण्यापासून बिबट्याचा मुक्काम नायगाव तालुक्यातच असून दोन दिवसापूर्वी रानसुगाव येथे कालवडीची शिकार केला तर मुस्तापूर शिवारात हरणाची शिकार केल्याची घटना दि. 23 रोजी सकाळी उघडकीस आली. बिबट्याच्या वास्तव्याने एक महिण्यापासून शेतकरी धास्तावले असून रात्रीची कामे तर बंदच आहेत पण महिलाही शेतात जाण्याची हिम्मत करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण नायगाव तालुका बिबट्याच्या दहशतीत वावरत आहे.
नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीत दि. 29 नोव्हेंबर रोजी बिबट्याने कंपणीतील एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच ठिकाणी वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याची घटना घडली. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले होते पण तो दुसऱ्याच दिशेने वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या समोरुनच निघून गेला.
वन विभागाच्या तावडीत न सापडल्याने नायगाव तालुक्यात बिबट्याची भिती निर्माण झाली. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची अफवा सुटत होती. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतखत जाणे तर टाळतच होते परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला होता.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना कमी पडल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली. मागच्या एक महिण्यापासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होत असतांनाच तीन दिवसापूर्वी रानसुगाव येथील बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला.
यामुळे तर रानसुगावसह हिप्परगा, निळेगव्हाण, टाकळगाव, पळसगाव, तलबिड व गंगणबीड परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले असतांनाच दि. 22 रोजी काही नागरिकांनी रानसुगाव येथील बिबट्याचा मारोती गंगाराम यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले याचा काही नागरिकांनी व्हिडीओही काढला आहे. रानसुगाव येथील घटना कालचीच असतांना आज मंगळवारी सकाळी मुस्तापूर शिवारातील हनमंत नेमाळे यांच्या शेताच्या बाजूला पुलाजवळ बिबट्याने हरणाची शिकार केल्याचे दिसून आले.
मुस्तापूर शिवारात बिबट्याने हरणाची शिकार केल्याच्या घटनेची माहिती, मजताच मोठ्या संख्येने शेतकरी व गावकरी घटनास्थळी गेले. वन विभागाचे अधिकारी बिबट्याचा बंदोबस्त करत नसल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. बिबट्याचा तालुक्यात वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.
तीन दिवसापूर्वी रानसुगाव येथे वन विभागाने लावलेल्या कँमेऱ्यात बिबट्या दिसला होता. त्याचबरोबर कालवडीची शिकारही केल्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मुस्तापूर येथेही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली हरणाची शिकारही केली असल्याचे सांगितले पण उपाययोजना नसल्याने बिबट्याची दहशत वाढतच चालली आहे.



