ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मिनीमंत्रालय बनले पार्किंग झोन त्यात एका कापड विक्री केंद्राचे बस्तान !

प्रशासक तथा, मुकाअ यांचे दुर्लक्ष ; अनेकांतून संताप !

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या नांदेड जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या आवाराला अनेकांनी जणू पार्किंग झोन बनविले असून गत काही महिन्यांपासून एका खादी कापड विक्री केंद्रचालकाने दुकान थाटून चक्क कायमस्वरुपी बस्तान बसविल्यानंतरही स्थानिक सामान्य प्रशासन व बांधकाम विभागासह प्रशासक तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने अनेकांतून नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, गत काही वर्षात पदाधिकाऱ्याविना असलेल्या नांदेड जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज सुरु असल्याने जिल्ह्यात ग्रामीण पातळीवर जनता त्रस्त बनलेली असतांनाच थेट प्रशासकीय ईमारतीत कार्यरत सर्वच विभागप्रमुख आपल्या मनमानी कर्तव्यात व्यस्त आहेत. त्यात भरिस भर म्हणून ईमारत परिसरात बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जणू वरदहस्त ठेवला जात असल्याचा प्रत्यय अनेकदा आलेला असून दृष्टीक्षेपात आलेल्या बाबींवर थेट कारवाईऐवजी खुद्द प्रशासक तथा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनही दोषींना पाठीशी घालण्यात येत आहे.

त्यामुळेच या ईमारतीत बहुतांश कामे कागदोपत्रीच पूर्ण करुन संगनमतातून अनेकजण आर्थिक विकास साधत आहेत. संरक्षकभिंत, सौर उर्जा प्रकल्प असो वा दुरुस्ती, सुशोभिकरण आदी एक ना अनेक कामे नियमबाह्यपणे करुन हात ओले करुन घेतांनाच या परिसरात दिवसा उजेड अन् रात्री अंधाराचे साम्राज्य आहे. सद्या येथे पदाधिकारीराज नाही. परंतू,अधिकारी- कर्मचारी, कंत्राटदार व पोटकंत्राटदार, अभ्यागत वा अडी-अडचण निवारणास नागरिकांची सातत्याने या जिल्हा परिषदेत ये-जा सुरु असली तरिही त्यांचे प्रमाण अधिकचे नाही. मात्र या ईमारतीच्या आवारात दोन व चारचाकी वाहने शेकडोंच्या संख्येत अस्ताव्यस्त पद्धतीने तासनतास उभी असतात.

आजू-बाजूची अनेक कार्यालय, अन्यस्त्र कर्तव्यासाठी ये-जा करणारी अधिकारी-कर्मचारी असो वा बाजारहाट करणारी मंडळी या ठिकाणी राजरोसपणे वाहने लावून जातांना आढळतात. स्थानिक सुरक्षारक्षकांनाही ती जूमानत नसल्याचे समजते. एकीकडे मुख्य प्रवेशद्वारापासून पूर्ण आवारात अस्ताव्यस्त वाहने तर, दुसरीकडे एका वाहनविक्री, थंडपेय विक्री केंद्रचालकाने दुसरे प्रवेशद्वार व परिसरावर कब्जा केला असून त्यात भरिस भर म्हणून एका खादी कापड विक्री केंद्रचालकाने गत काही महिन्यांपासून चक्क मुख्य प्रवेशद्वारावर आपले कायमचे बस्तान बसविल्याने अनेकांना मार्ग शोधीत या ईमारतीत प्रवेश करावा लागतो आहे. त्यात जेष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सोसावा लागतो आहे.

दरम्यान, या ईमारतीत स्थानिक सामान्य प्रशासन विभागाचा ये-जा करणारे वाहनचालकांना कामे असलेल्या विभागाची नोंद तसेच,वाहन शुल्क आकारणीचा केलेला फंडाही काही दिवसातच बंद केला असल्याने पून्हा एकदा या आवाराला पार्किग झोनचे स्वरुप आलेले असून ग्रामीण भागात अतिक्रमणमूक्तीत कर्तव्यतत्पर असल्याची वल्गना करणार्‍या जिल्हा परिषदेच्या थेट आवारात दोन्ही प्रवेशद्वारावर कायमस्वरुपी बस्तान बसविलेल्या वाहन, थंडपेय व मुख्यत्वेकरून कापड विक्री केंद्रचालकांची स्थानिक प्रशासनाकडून पाठराखण केली जात असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्याच कर्तव्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker