ताज्या बातम्यानांदेडबिलोली

‘देशाच्या शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची – डाॅ. पस्तापुरे

मोरे मनोहर

किनाळा :-‘देशाच्या शाश्वत विकासासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असून युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जिद्द व चिकाटी बाळगून कटिबद्ध व्हावे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे जिल्हा राष्ट्रीय समन्वयक डॉ.भागवत पस्तापुरे यांनी केले.

ते शंकरनगर तालुका बिलोली येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे बिजूर तालुका बिलोली येथे दिनांक 15 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित विशेष वार्षिक शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक व माजी मुख्याध्यापक मोहनराव शिनगारे हे होते तर मंचावर डॉ.संभाजी मनुरकर, डॉ.गंगाधर भोपाळकर, बिजूर येथील सरपंच सौ जयश्रीताई खिसे तसेच मुख्याध्यापक शंकर सुरकुटलावार, पोलीस पाटील शिनगारे, कुंटूरकर, शिवराज खिसे, रमेश भेलोंडे, प्र.प्राचार्य डॉ.हेमंत बक्षी, प्राचार्य शिवाजीराव पाटोदे आदीची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात गाडगे महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. धनश्री तोडे व वैशाली तोडे यांनी गायलेल्या स्वागत गीतानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुरभाजी भुमरे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिबिरा दरम्यान झालेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. यानंतर प्राचार्य डॉ शिवाजीराव पाटोदे यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांच्या सहकार्याची व स्वयंसेवकाच्या कार्याची प्रशंसा केली व बिजूर हे गाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास दत्तक द्यावे असे आवाहन केले.

सरपंच प्रतिनिधी श्रीमान शिवाजी खिसे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे डॉ.संभाजी मनुरकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास त्याचे महत्त्व आणि उपयोगिता यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

डॉ.गंगाधर भोपाळकर यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेत केलेल्या उपक्रमाचे माहिती दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना श्रीमान भाऊराव शिनगारे म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिस्त श्रम व राष्ट्राभिमान बाळगून काम केल्यास देशाचा शाश्वत विकास व्हायला वेळ लागणार नाही. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील शिबिरा दरम्यानचे अनुभव कथन केले. सरपंच प्रतिनिधी शिवराज खिसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रामस्थांकडून राशीयोचे कार्यक्रमाधिकारी सहयोगी प्राध्यापक व प्राचार्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, प्राध्यापक, विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहयोगी प्रा.डॉ.दयानंद माने यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी बालाजी डाकोरे यांनी आभार प्रकट केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker