किनाळा येथील शेतकऱ्यांचे १७ रोजी नांदेड – देगलुर राज्य महामार्गावर रस्ता रोको अंदोलन

मोरे मनोहर
किनाळा :- अतिवृष्टीच्या पावसामुळे नाल्यांना पूर येऊन पिकासह जमिनी खरडून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या नाल्या लगत असलेल्या विहिरीत पुराची गाळ पडून विहिरीही बुजल्या यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने किनाळा तालुका बिलोली येथील संतप्त शेतकऱ्यांनी नांदेड – देगलूर राज्य महामार्गावर किनाळा येथे 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाअधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
अधिक माहिती अशी की किनाळा येथून तळणी प्रकल्पातील तलावात जाणाऱ्या नाल्यात किनाळा परिसरातील पंचक्रोशीतील अनेक गावाचे येणारे पाणी आणि झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या नाल्यांना पाण्याचा पूर येऊन नाल्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे आठशे एकर शेतातील पिकांसह जमिनी खरडून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या नाल्यालगत असलेल्या विहिरी नाल्यांच्या पुराचा गाळ विहिरीत पडून विहिरी बुजून गेल्या यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
किनाळा तालुका बिलोली येथील नाल्या काटांच्या शेतकऱ्यांच्या शेतातील खरीबाचे सर्व पीक पाण्यात जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी कोणताही राजकीय नेता आला नाही की कोणता शासकीय अधिकारी येऊन पाहिला नसल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतकऱ्यांच्या भुजलेल्या विहिरींचे सर्वे करून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी नुकसान झालेल्या विहिरीचे पाणी घेता यावे यासाठी तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या विहिरीची भरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावे म्हणून 8 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार बिलोली यांना लेखी निवेदनही देण्यात आली होती मात्र त्यांच्या या निवेदनाला केराची टोपली दाखवले आहे.
बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर यांना किनाळा येथील शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी त्यांना फोन केले असता संबंधित शेतकऱ्यांची व्यथा ऐकून न घेता त्यांना मी पुन्हा बोलतो असे सांगून त्यांचा फोन कट केल्याने शेतकऱ्यांत आमदारा विषयी तीव्र नाराजी असून सदरील शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधी सह प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्याला न्याय न दिल्यास नांदेड देगलूर राज्य महामार्गवर किनाळा येथे 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.



