रातोळी येथे रोकडेश्वर महाराज यात्रेनिमित्त भव्य लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन

New Bharat Times नेटवर्क
नायगांव :- नायगांव तालुक्यातील रातोळी येथील सुप्रसिद्ध रोकडेश्वर महाराज देवस्थानाच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या यात्रेनिमित्त सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी भव्य लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिकच बहरणार आहे. या भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी पंचक्रोशीतील श्रोत्यांना मिळणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी व गावकऱ्यांनी केले आहे.
दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १ ते २ या वेळेत लोककला महोत्सव तर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष लावणी व कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे तसेच महाविद्यालयीन पदवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. पंचक्रोशीतील कलावंतांनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असलेल्या रसिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, रातोळी येथील प्रसिद्ध रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, पूजा तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री १२ वाजता बारूदच्या नयनरम्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. आज दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर भव्य कुस्त्यांचा फड भरवण्यात आला आहे. या कुस्त्यांमध्ये आखेरची कुस्ती ११११ रुपयांची ठेवण्यात आली असल्याने कुस्ती शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
तसेच दि. १ ते ३ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये सुप्रसिद्ध सोनाली पाटील नाशिककर यांचा लोकनाट्य मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमात भजन, कीर्तन, काकडा आरती, अभिषेक, पूजा, महाप्रसाद आदी धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम भक्तिभावाने पार पडत आहेत. रोकडेश्वर महाराज यात्रेमुळे संपूर्ण रातोळी गाव भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक उत्साहाने भारावून गेले असून भाविक व नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत आहेत.



