नायगांव शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; पोलिसांच्या भूमिकेवर सोशल मीडिया वरून जनतेचा संताप

सय्यद जाफर
नायगाव :- नायगांव शहरात अवैधरित्या दारू, गुटखा व मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे अवैध धंदे पोलिसांच्या आश्रयानेच राजरोसपणे सुरू असून गुंड प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक, विशेषतः महिला व शाळकरी विद्यार्थिनी, असुरक्षिततेच्या छायेत जीवन जगत आहेत. शांत व सुरक्षित शहर म्हणून नायगांवची जी ओळख होती. ती फक्त पोलिसांच्या भूमिका व कार्यप्रणालीमुळे लोप पावत चालण्याची भावनाही जनता सोशल मीडिया वरून व्यक्त करीत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष देऊन अवैध धंदे बंद करावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
नायगांव शहरातील प्रमुख चौक, गल्ल्या आणि काही संवेदनशील भागांत उघडपणे गुटखा विक्री, हातभट्टी दारू व मटका अड्डे सुरू असल्याचे नागरिक सांगतात. या अवैध व्यवसायांमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून टवाळखोरांचा त्रासही वाढल्याची तक्रार आहे. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना रस्त्यावरून जाताना अश्लील टिप्पण्या व छेडछाडीचा सामना करावा लागत असल्याची भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
नायगांव पोलीस ठाण्याचा कारभार प्रत्यक्षात स्थानिक बीट जमादारांकडेच असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. पोलीस निरीक्षक कार्यालयातच मर्यादित राहतात, तर मैदानात प्रभावी कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध धंदे बंद करण्याऐवजी हप्ते वसुलीवरच अधिक भर दिला जात असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकेकाळी सुरक्षित व शांत शहर म्हणून ओळख असलेल्या नायगांवमध्ये आज भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करावी, तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके नियुक्त करावीत अशी मागणी जोर धरत आहे. नायगांव शहर पुन्हा सुरक्षित आणि गुन्हेमुक्त व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
शांत व सुरक्षित नायगांव शहराची शांतता भंग होऊन स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे बेभानपणे चालू असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी या गंभीर विषयाकडे लक्ष का देत नाहीत ? या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी ही सोशल मीडियाद्वारे जनतेने केली आहे.



