ताज्या बातम्यानांदेडनायगांव

२९ किलोमीटरचा रस्ता की भ्रष्टाचाराचा महामार्ग ? ‘राजसेतू’ कंपनीच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय समीती गठीत करुन चौकशी करण्याची मागणी

शंभर कोटीच्या सी सी रस्त्याचे काम निकृष्ट

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव ते उमरी तालुक्याला जोडणारा अतिशय रस्ता क्रमांक २६४ हा महत्वाचा आहे. या २९ किलोमीटर रस्त्यासाठी म.रा. पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने शंभर कोटीच्या वर रक्कम मंजूर आहे. मात्र या रस्त्याचे काम करणारी ‘राजसेतू’ कंपणी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महिपाळे यांनी थेट मुंबई गाठून मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघातील राज्य रस्ता क्रमांक २६४ इपीसी एनडी – II (३३अ) उमरी, तळेगाव, बळेगाव, इकळीमाळ, कुंटूर व नायगाव या २९ किलोमीटरच्या रस्त्याचे काम मागच्या वर्षी मंजूर झाले. नायगाव मतदारसंघात नायगाव व उमरीला जोडाणारा राज्य रस्ता क्रमांक २६४ हा अतिशय महत्वाचा आहे.

मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे राज्य सरकारने या २९ किलोमीटरच्या दोन पदरी रस्ता करण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यासठी एवढा मोठा निधी पहील्यांदाच शासनाने उपलब्ध करुन दिल्याने काम दर्जेदार होईल असे नागरिकांना वाटत होते परंतु या रस्त्याचे काम करणाऱ्या ‘राजसेतू’ कंपणीने अतिशय सुमार दर्जाचे काम करत आहे.

ज्या ‘राजसेतू’ कंपणीने कामाचे कंत्राट घेतले आहे त्यांनी अंदाजपत्रकात नमूद असलेल्या मानाकंनाप्रमाणे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. होत असलेले कामावर देखरेख ठेवण्यासाठी महामंडळाचा एकही अधिकारी येत नसल्याने संबधीत कंत्राटदार अंदाजपत्रकातील तरतुदी धाब्यावर बसवून काम करत आहे असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमानुसार सी सी रस्ता कामाचे आयुष्य ३० वर्षाचे आहे परंतु होत असलेल्या सी सी रस्त्याला आठ दिवसातच जागोजागी तडे जात असल्याने शासनाच्या निर्देशाला हरताळ फासण्याचे काम ‘राजसेतू’ कंपणी करत आहे. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वीच केंद्रीय रस्ते निधीतून २० कोटी रुपयांचा खर्चून कुंटूर ते शेळगाव दरम्यान चांगल्या दर्जाचे काम करणात आले होते. त्या ठिकाणी नवीन मटेरियल न टाकता जुन्याच मटेरियलचा वापर करण्यात येत आहे.

राज्य रस्ता क्रमांक २६४ उमरी, तळेगाव, बळेगाव, इकळीमाळ, कुंटूर व नायगाव या २९ किलोमीटरचे काम दर्जेदार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचा एकही जबाबदार अधिकारी या कामाकडे फिरकत नसल्याने वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असलेल्या रस्त्याचे काम पुर्ण न होण्याच्या अगोदरच वाताहत होत आहे. त्यामुळे निकृष्ट व दर्जाहीन होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासह आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रकाश महिपाळे यांनी दिला आहे.

सदरच्या कामाबाबत माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुनील ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker