नांदेड वाहतूक सर्वेक्षण साठी CRRI चे शुल्क माफ करून होलीसिटी घोषित करा : खा.डॉ.अजित गोपछडे यांची जितेंद्र सिंह यांच्याकडे मागणी

धम्मदिप भद्रे
नांदेड : नांदेड हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक शहर आहे. अमृतसर नंतर नांदेड हे दुसरे सर्वात महत्त्वाचे शीख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, मुख्यतः “गुरुद्वार हजूर साहिब” च्या उपस्थितीमुळे. नांदेडमधील ऐतिहासिक स्थळे समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवितात. पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नांदेडमधील वाहतूक समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
तसेच नांदेड हे आता मेडिकल आणि एज्युकेशनल हब झाले आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील रुग्ण तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे शिक्षणासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी वास्तव्य करतात परिणामी रहदारी प्रचंड वाढली आहे. खा.गोपछडे यांनी हा मुद्दा राज्यसभेच्या निदर्शनास पूर्वीच आणून दिला आहे, CSIR च्या केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेकडून वाहतूक सर्वेक्षण आणि उपाययोजनांची विनंती केली आहे.
या संदर्भात, सीआरआरआयने नांदेड महानगरपालिकेला अंदाजे एक कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे; तथापि, काही प्रशासकीय आव्हानांमुळे, नांदेड महानगरपालिका सीआरआरआयला हे शुल्क भरण्यास असमर्थ आहे. खा.डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली की सीआरआरआय द्वारे नांदेडमध्ये वाहतूक सर्वेक्षण करण्यासाठी आणि उपाययोजना प्रदान करण्यासाठी हे शुल्क माफ करावे.
नांदेड ला होलीसिटी घोषित करुन देशातील प्रमुख शहर, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकासित करावे अशी मागणी केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांनी पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री यांची भेट घेऊन पवित्र शहर नांदेड च्या विकासाबाबत विविध बिंदु वर सविस्तर चर्चा केली.



