युद्धाच्या पार्श्वभूमीला समोर करून गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा ; नायगांव तालुक्यात ब्लॅक मार्केटिंगचा धंदा तेजीत

सय्यद जाफर
नायगाव :- इराक – इजराइल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन दरवाढीची चर्चा सुरू असल्याची बाब पुढे करीत नायगांव तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या कृत्रिम तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. तालुक्यातील काही परवानाधारक गॅस वितरकांकडून गॅस सिलेंडरचा साठा असूनही ग्राहकांना वेळेवर पुरवठा न करता ब्लॅक मार्केटमध्ये दुप्पट दराने विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी महसूल विभागाला वेळ नाही की काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महसूल विभागाने तातडीने गॅस एजन्सी धारकांचे वितरण व स्टॉक तपासून नागरिकांना गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
नायगांव तालुक्यात नियमित बुकिंग करूनही अनेक दिवस घरगुती सिलेंडर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी “सिलेंडर उपलब्ध नाही” असे कारण देत ग्राहकांना परत पाठवले जात आहे. मात्र त्याच वेळी काही दलालांच्या माध्यमातून किंवा ओळखीने गॅस सिलेंडर दुप्पट दराने उपलब्ध करून दिला जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी गॅसची गरज अधिक असते. अशा परिस्थितीत कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची अडवणूक होत असल्याचा आरोप होत असून महिलांमध्ये व कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक तहसील कार्यालय तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून गॅस वितरकांच्या साठ्याची तपासणी करावी आणि ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष घालून गॅसचा सुरळीत पुरवठा सुरू करावा, अन्यथा नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.



