रामतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा फज्जा ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिकांची निराशा
घरकुल चे प्रश्न उपस्थित होताच बिडिओ झाले मधेच गायब

शेषेराव कंधारे
नायगाव :- रामतीर्थ मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान अंतर्गत शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवोदय विद्यालयात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिबीर सुरू होताच अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आल्याने या शिबिराचा चांगलाच फज्जा उडाला.

शिबिराच्या सुरुवातीलाच तक्रारदार विठ्ठल माने यांनी सर्व २६ विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार एकेका अधिकाऱ्यांची हजेरी घेतली असता अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत आणि शिबिराचा उद्देशच फोल ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर राहिले. काही कर्मचारी अध्यक्षीय समारोप होताच अचानक निघून गेल्याने सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या नागरिकांना मोठी निराशा सहन करावी लागली.

रामतीर्थ मंडळातील रामतीर्थ, हिप्परगा माळ, किनाळा, कामरसपल्ली, चिटमोगरा, अटकळी, टाकळी खुर्द, डोणगाव बु., पाचपिंपळी, रामपूर, केरूर, बिजूर, डोणगाव खुर्द या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक विविध तक्रारी व अर्ज घेऊन शिबिरात आले होते. मात्र अनेक स्टॉलचे टेबल रिकामे असल्याने नागरिक एकमेकांकडेच चौकशी करत ताटकळत उभे राहिले.
अखेर कोणत्याही प्रश्नांचे निराकरण न झाल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. या शिबिरासाठी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, बाबाराव पाटील, हणमंत पाचाळ, जिगळा येथील जाधव, रामतीर्थ येथील कांबळे यांच्यासह परिसरातील काही ज्येष्ठ महिला आणि नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र जागेवरच समाधान न झाल्याने त्यांनाही निराश होऊन परतावे लागले.
दरम्यान अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल. तसेच जे कर्मचारी शिबिरास गैरहजर राहिले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शिबिराच्या नियोजनात घाईगडबड झाल्याने येत्या शनिवारी पुन्हा समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाने नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले हे शिबिर प्रत्यक्षात केवळ औपचारिकतेपुरतेच राहिल्याची टीका किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी केली. येत्या शनिवारी होणाऱ्या शिबिराचे अधिक प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी नायब तहसीलदार वंदना गवई, नायब तहसीलदार अनिल परळीकर, बिडिओ श्रीनिवास पदमवार, मंडळ अधिकारी कल्पना मुडकर, विजय पा.जाधव, तण्हंक दरबारे, प्रणिता काळे, मिलिंद सुपेकर, संतोष शाहणे, अवलकारकुन गायकवाड यांच्या सह आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



