सगरोळी घाटावरील कारवाईनंतर बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी चर्चेत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कर्तव्यदक्ष व धाडसी पोलीस अधिकारी अशी प्रतिमा बनवलेले बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर हे त्यांच्याच तालुक्यात असलेल्या सगरोळी व गंजगाव या दोन वाळू घाटात वाळू माफीयांचा सुरु असलेल्या हैदोसावर मौन बाळगून होते. मात्र सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षकाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पानेगावकर चर्चेत आले असून. पानेगावकरांचे मौन कोणत्या प्रकारात मोडते याची जोरदार चर्चा होत आहे.
बिलोली तालुक्यातील अधिकृत वाळू घाटात सुरु असलेल्या अनाधिकृत कारभाराचा बिलोली बाहेरच्याच अधिकाऱ्यांनी कारवाई करुन स्थानिक अधिकाऱ्यांचे आजपर्यंत पितळ उघडे करण्याचे काम करत आले आहेत. अनाधिकृत कारभाराबाबत कायवाई करण्याचे काम महसूल विभागाचे असले तरी अशा कारवाया करण्यात पोलीस विभागच सध्या अग्रेसर असला तरी बिलोलीची पोलीस यंत्रणा मात्र वाळू माफीयांचे हस्तक म्हणूनच काम करत आहेत असे दिसते. सावळी रोडवरील हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईनंतर बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते तर पानेगावकर यांच्यावर मात्र काहीही कारवाई झाली नव्हती.
बिलोली तालुक्यात सगरोळी व गंजगाव वाळू घाट सुरु असून या घाटावर लिलावधारकाकडून प्रचंड हैदोस सुरु आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ह्रास करुन मांजरा नदीत उत्पात माजवण्यात येत आहे. याबाबत पोलीस उपमहानिरीक्षकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने शनिवारी धाडसी कारवाई केली. यात 8 जेसीबी आणि 36 हायवा ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आणि उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर चर्चेत आले.
वास्तविक गंजगाव आणि सगरोळीच्या अधिकृत घाटात सुरु असलेला अनाधिकृत कारभाराला आळा घालण्यासाठी पानेगावकर यांनी कारवाई करणे अपेक्षित होते. कारण एक धाडसी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची बिलोली उपविभागात प्रतिमा झाली होती. त्यामुळे त्यांनी सगरोळी वाळू घाटात सुरु असलेला हैदोस थांबवला पाहीजे होता परंतु त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहून मौन बाळगले.
पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर बिलोलीतील पोलीस यंत्रणा वाळू माफीयांच्या ताटखालचे मांजर झाल्याची जोरदार टिका होत असून उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी बाळगलेल्या मौनाबद्दलही आता चर्चा सुरू झाली असून त्यांचे मौन कोणत्या प्रकारात मोडते याबद्दलही चर्चा सुरु झाली आहे.



