ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव येथील शगुन गॅस एजन्सीचा मनमानी कारभार! ; पहाटे ३ वाजेपासून रांगेत उभे राहूनही नागरिकांना गॅस मिळेना!

नायगाव येथील शगुन गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

मनोहर मोरे

शंकर नगर:- नायगाव येथील शगुन गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून, ऑनलाइन डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) आणि OTP येऊनही केवळ ‘केवायसी’चे (KYC) कारण पुढे करून गॅस नाकारला जात आहे. पहाटे ३ वाजेपासून रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने नायगाव परिसरात गॅस एजन्सी विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

ग्रामीण भागात पूर्वी घरपोच मिळणारी गॅस सेवा आता विस्कळीत झाली आहे. गॅस टंचाईचे कारण सांगून एजन्सीकडून ग्राहकांवर जाचक अटी लादल्या जात आहेत. नियमानुसार, ज्या ग्राहकांकडे ऑनलाईन DAC कोड आला आहे, त्यांना गॅस मिळणे अपेक्षित असते. मात्र, शगुन गॅस एजन्सीकडून “तुमचे कार्ड केवायसी नसल्यामुळे बंद आहे” असे सांगून ग्राहकांना तासन्‌तास उन्हात उभे राहिल्यानंतर परत पाठवले जात आहे.

या गोंधळामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला आणि एजन्सीला काही रोकठोक सवाल विचारले आहेत:

  • ​जर आमचे कार्ड केवायसी अपडेट नसेल, तर आम्हाला ऑनलाइन ‘डीएसी’ आणि ‘ओटीपी’ कसा प्राप्त झाला?
  • ​आजवर गावागावात गाडी येऊन ५०-१०० रुपये जास्तीचे घेऊन गॅस दिला जात होता, तेव्हा केवायसीची अडचण कशी आली नाही?
  • ​अनेकांना “तुम्ही आजवर गॅसच घेतला नाही” असे सांगून अपमानित का केले जात आहे?

एजन्सीकडून दमदाटीचा सूर:

उन्हात रांगेत उभे राहूनही गॅस न मिळाल्याने विचारणा करणाऱ्या ग्राहकांना “ऑफिसला या, आधी केवायसी करा आणि मगच गॅस मिळेल,” अशा शब्दात दम दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चौकशीची मागणी:

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण असतानाही प्रत्यक्ष गॅस नाकारणे हा ग्राहकांची फसवणूक करण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नायगाव येथील शगुन गॅस एजन्सीच्या या गैरकारभाराची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker