इज्जतगाव येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा : कुंटूर पोलीसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून मागच्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. काल दि. 28 रोजी कुंटूर पोलीसांनी इज्जतगाव येथील गोदापात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या ३ लोखंडी फायबर बोटी व ३ छोटे इंजीन लोखंडी व एक बोट पकडल्या. परंतु थातूरमातूर कारवाई करुन सोडून देण्यात आल्याची जोरदार चर्चा होत आहे तर दुसरीकडे पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रेसनोटमध्ये स्फोटकाने उडवण्यात आल्याचे नमूद आहे. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून बंद असलेला अवैध वाळू उपसा काही दिवसापासून सुरु झाला असून वाळू माफीया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून रात्रीला सक्षण पंप व बोटीच्या सहाय्याने दिवसरात्र वाळूचा उपसा सुरु आहे. परंतु अचानक काल दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता कुंटूर पोलिसांना इज्जतगाव येथे माधव बालाजी डोईफोडे यांच्या शेतालगत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे तहसीलदार धम्मप्रिया गायवाड, मंडळ अधिकारी सचिन आरु, तलाठी गोविंद काळे, तलाठी बाबु डाकेवाड अदिसह सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले हे दुपारी ३ वाजता पोहचले. इज्जतगाव येथील गोदावरी नदी पात्राच्या कडेला तीन लोखंडी फायबर व तीन इंजन बोटा व एक मोठी बोटीच्या सहाय्याने रेती उत्खनन करीत असल्याचे दिसून आले.
महसूल व पोलीस पथक आल्याने वाळू उपसा करणाऱ्यांनी बोटी सोडून पळ काढला. त्यामुळे या बोटी ताब्यात घेवून कुंटूर पोलिसांनी धाडसी कारवाई केल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी थातूरमातूर कारवाई करुन बोटी सोडून दिल्या. बोटचे मालक कैलास गंगाधर ढगे रा.येळी कौडगाव ता. लोहा कोंडीबा पाकलवाड स.वाघाळा ता.उमरी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
कुंटूर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करुनबोटी सोडल्या असल्याची जोरदार चर्चा ( दि. 28 पासून होत असतांनाच दि. 29 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रेसनोट काढत कुंटूर पोलीसांनी ३ लोखंडी फायबर बोटा व 3 छोटे इंजीन लोखंडी बोटा व 4 ब्रास काळी रेती असा एकूण 90 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. लोखंडी फायबर बोट व छोटे इंजीन लोखंडी बोट हे जागेवरुन हलविणे अवघड असल्याने, तहसीलदार, नायगांव यांचे आदेशाने सदरचा मुद्देमाल हा पंचासमक्ष जागीच जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केला असल्याचे नमूद केले आहे.
कुंटूर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करुन बोटी सोडल्या असल्याची एकीकडे चर्चा रंगत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या प्रेसनोटमध्ये मात्र कुंटूर पोलिसांचे कौतुक करण्यात आले. त्यामुळे ही कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे



