ताज्या बातम्यानांदेडबिलोली

वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा निवारा धोक्यात; बिलोलीत वनविभागाच्या सतर्कतेमुळे वानराच्या पिल्लाला जीवदान

New Bharat Times नेटवर्क

बिलोली :- वाढत्या उन्हाळ्याचा तडाखा आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ‘वानरसेने’ने आता शहरांकडे धाव घेतली असून, बिलोलीत जाळीत अडकलेल्या एका वानराच्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने वाचवून जीवदान दिले.

​तालुक्यात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून तापमानाचा पारा चढलेला आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावल्याने जंगलातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी, तहानलेले वन्यप्राणी डोंगराळ भाग सोडून मानवी वस्त्यांकडे वळू लागले आहेत. तालुक्यातील माळरान आणि फळबागांमधील वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने प्राण्यांना ना सावली उरली आहे, ना अन्नाचा शोध घेता येत आहे.

​बिलोली शहर परिसरात अन्नाच्या शोधात आलेल्या वानरांच्या टोळीतील एक लहान पिल्लू आंब्याच्या झाडावर चढले होते. मात्र, फळांच्या संरक्षणासाठी झाडाला लावण्यात आलेल्या जाळीत हे पिल्लू पूर्णपणे अडकून पडले. पिल्लू जाळीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतानाच ही बाब वनविभागाच्या लक्षात आली.

​घटनेची माहिती मिळताच बिलोली वनपरिमंडळ अधिकारी डी.एस. डावकोरे, वनरक्षक व्ही. एम. अंबुलगे आणि वनमजूर शेषेराव इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने त्या पिल्लाला जाळीतून मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या या सतर्कतेमुळे पिल्लाचे प्राण वाचले असून परिसरात त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

​वाढती वृक्षतोड आणि पाणी टंचाई यामुळे वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी अशा वेळी प्राण्यांना इजा न करता वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker