दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बिलोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व २७,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी ३ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे.
सदरची घटना (ता.९) नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे ही घडली. पीडितेने स्वतः उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २१३/२०२३ दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी तत्कालीन सहाय्यक पो.नि. विशाल बहात्तरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
कुंटूर पोलीसांच्या दोषारोप पत्रानुसार मा. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अति. सत्र न्यायाधीश बिलोली वि. ब. बोहरा यांनी (ता.२२) एप्रिल रोजी हा निकाल दिला. आरोपी योगेश भिमराव कोंडेवाड, वय ३२, रा. वंजारवाडी ता. नायगाव, जि. नांदेड यास कलम ३७६(२)(ल), ४५२ भा.दं.वि. व लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ४(२), ६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.दोषी ठरवण्यात आल्यानंतर न्यायाधिश बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व २७,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी ३ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे असा निर्णय दिला.
या गंभीर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक सरकारी अभियोक्ता श्री.संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. जयेश संदीप अग्रवाल, अॅड. योगेश सतीश पुंड, पैरवी कर्मचारी पी.आय. इजूलकंटे, पो.हे.का. ४११, सय्यद गौस यांनी सहकार्य केले.



