महसूल आणि पोलीस प्रशासनाचे ‘गाव सोडून शेजारच्या तालुक्यात’ प्रेम; बिलोलीतील अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष का?
उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ; सगरोळी, गंजगाव घाटावरील 'ओव्हरलोड'कडे कानाडोळा

प्रकाश महिपाळे
नांदेड :-विधिमंडळ अभ्यास समितीचा दौरा होऊन साधारण वीस दिवस उलटले असतानाही बिलोली तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, यावर कडक कारवाई करण्याऐवजी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी (SDM) क्रांती डोंबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) पानेगावकर हे स्वतःच्या जवळचे बिलोली येथे अवैध धंदे सोडून नायगाव तालुक्यात कारवाईचा ‘पराक्रम’ गाजवण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी आणि गंजगाव हे रेती घाट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या घाटांवरून जेसीबीच्या साहाय्याने नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासकीय कार्यालयांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या घाटांवरून दररोज हायवा भरून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत आहे. नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या प्रकाराकडे डोळेझाक करत दोन्ही अधिकारी नायगाव तालुक्यात कारवाया करत आहेत.
सगरोळी आणि गंजगाव परिसरात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून जेसीबीने रेती उपसा सुरू आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे बिलोलीचे हे ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी तिथे फिरकतही नाहीत. उलट, नायगावमध्ये जाऊन कारवाई करण्याचे त्यांचे ‘प्रेम’ सध्या तालुक्यात चर्चेचा आणि संशयाचा विषय ठरत आहे. माफियांकडे दुर्लक्ष करून नायगाव तालुक्यात पराक्रम गाजवण्यामागे नक्की कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
नुकतेच अंतरगाव येथे झालेल्या कारवाईनंतर डीवायएसपी पानेगावकर यांनी आपल्या कामगिरीचे कौतुक करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिलोलीतील स्थानिकांकडून असा प्रश्न विचारला जात आहे की, जर अधिकारी इतकेच कार्यक्षम आहेत, तर त्यांना बिलोलीतील मुख्य रस्त्यांवरून धावणारे ओव्हरलोड हायवा आणि नदीपात्रात चालणारे जेसीबी का दिसत नाहीत?
एकीकडे नायगावमध्ये जाऊन कारवायांचा धडाका लावायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच कार्यक्षेत्रातील बिलोली येथे अवैध उत्खननाला अभय द्यायचे, या दुटप्पी भूमिकेमुळे ‘काहीतरी काळंंबेरं’ असल्याचा संशय बळावत आहे. विठ्ठल शिंदे यांच्या तक्रारीवरून समोर आलेल्या ताज्या प्रकरणामुळे (ज्यात रिकाम्या हायवावर कारवाई झाल्याचा आरोप आहे) पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आधीच टीका होत आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे



