ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

​बिलोलीत आपत्कालीन सेवेचा खेळखंडोबा ; अग्निशमन दलाच्या वाहनातून तहसील कार्यालयाला पाणी पुरवठा!

प्रकाश महिपाळे

​नांदेड : – नगर परिषद बिलोलीच्या अग्निशमन दलाच्या वाहनाचा (Fire Brigade) प्रशासकीय कामासाठी गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असलेले हे वाहन चक्क तहसील कार्यालयाची पाण्याची टाकी भरण्यासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले असून, याविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास नगर परिषद बिलोलीचे अग्निशमन वाहन (क्र. MH 26BE 7493) तहसील कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळाले. हे वाहन आग विझवण्यासाठी नव्हे, तर तहसील कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची टाकी भरण्यासाठी वापरले जात होते. एका शासकीय कार्यालयाने आपल्या दैनंदिन गरजांसाठी अग्निशमन दलाच्या वाहनाचा असा वापर करणे, हा कायद्याचा भंग असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

​’महाराष्ट्र अग्निशमन सेवा अधिनियम’ नुसार, ही वाहने केवळ आग विझवणे, पूर परिस्थिती किंवा इतर गंभीर आपत्कालीन कामांसाठीच राखीव असतात. ज्या वेळी हे वाहन तहसीलमध्ये पाणी भरत होते, त्याच वेळी शहरात किंवा तालुक्यात कोठेही आगीची दुर्घटना घडली असती, तर त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पत्रकार सय्यद रियाज यांनी उपस्थित केला आहे. केवळ प्रशासकीय सुविधेसाठी जनतेच्या जीविताला धोका निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

​या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, दोषींवर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकारी (नगर परिषद बिलोली) आणि जिल्हाधिकारी (नांदेड) यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारचा गैरवापर होणार नाही, याची लेखी हमी देण्याची मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.


​”येत्या सात दिवसांच्या आत या अर्जावर काय कारवाई केली, याची लेखी माहिती न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा तक्रारकर्ते सय्यद रियाज यांनी दिला आहे.
​या तक्रारीच्या प्रती तहसीलदार (बिलोली) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता या गंभीर प्रकरणावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker