ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सीमा भागातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस? निकृष्ट सिमेंट रस्त्यांवर शिष्टमंडळाचा संताप — पालकमंत्र्यांकडे धडक!

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- सीमा भागात कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाची मालिका सुरू असल्याचा गंभीर आरोप करत १ मे २०२६ रोजी शिष्टमंडळाने पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन जोरदार निवेदन सादर केले. या प्रकरणामुळे सीमा भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

प्रकाश कऱ्हाळे आणि गोविंद मुंडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्तरातील नागरिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सिमेंट रस्त्यांच्या कामातील कथित गैरप्रकार, निधीचा अपव्यय आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामांची साखळी याकडे लक्ष वेधले. “कागदोपत्री दर्जेदार काम, प्रत्यक्षात मात्र रस्ते उखडलेले आणि दर्जाहीन” अशी तक्रार शिष्टमंडळाने मांडत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही पालकमंत्र्यांच्या समवेत उपस्थित होते. शिष्टमंडळाने सविस्तर मांडणी करताना प्रकरणाची गांभीर्यता अधोरेखित केली. मात्र, परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन अशोकराव चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणे पसंत केल्याने चर्चेला अधिकच उधाण आले.

सीमा भागातील सिमेंट रस्त्यांच्या कामांबाबत वारंवार तक्रारी येत असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. “भ्रष्टाचाराची साखळी थांबवली नाही तर आंदोलन उग्र होईल,” असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.

दरम्यान, पालकमंत्री अतुल सावे यांनी निवेदन गांभीर्याने घेत चौकशी करण्याचे संकेत दिल्याची माहिती मिळत आहे. आता प्रशासन या प्रकरणात कितपत कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker