ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गावोगावी इंजेक्शन, सलाईन, गोळ्या वाटणाऱ्या बोगस‘डॉक्टर’चा रुग्णांच्या जीवाशी खेळ : प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील छोट्या-मोठ्या गावांमध्ये कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना दवाखाने थाटून लोकांवर उपचार करणाऱ्या बोगस ‘डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कुठलीही वैद्यकीय पदवी नसतानाही ‘डॉ.’, ‘क्लिनिक’, ‘हॉस्पिटल’ असे बोर्ड लावून अनेकजण प्रॅक्टिस करत आहेत. काहीजण फक्त आर एम पी, कंपाउंडर किंवा मेडिकलमधील अनुभवाच्या जोरावर अँलोपॅथीच्या गोळ्या, इंजेक्शन, सलाईन देत आहेत. ताप, सर्दी-खोकल्यापासून ते कावीळ, टायफॉइड, प्रसूती, लहान मुलांच्या आजारांवरही हे बोगस डॉक्टर उपचार करत आहेत. चुकीच्या औषधांमुळे रुग्ण दगावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

बोगस डॉक्टर म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ. चुकीचे इंजेक्शन, चुकीची मात्रा यामुळे किडनी फेल, लिव्हर डॅमेज, रेझिस्टन्स असे आजार होतात. कायद्यानुसार अँलोपॅथी प्रॅक्टिस फक्त एम बी बी एस डॉक्टरच करू शकतो. बि ए एम एस व बि एच एम एस ला मर्यादित परवानगी आहे. याशिवाय उपचार करणे म्हणजे भा.दं.वि. 419, 420 व मेडिकल प्रॅक्टिशनर्स अँक्ट नुसार गुन्हा आहे.

सरकारी दवाखाना लांब असल्याने व पैसे वाचवण्याच्या नादात गरीब रुग्ण यांच्याकडे धाव घेतात. 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत फी आकारून हे डॉक्टर लाखोंची कमाई करत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. “तपासणीला आलो” असे सांगून काही कर्मचारी हप्ता घेऊन जातात, असा आरोप नागरिक करत आहेत. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सकाकडूनही आजवर मोठी कारवाई झालेली नाही.

तालुक्यातीलबोगस डॉक्टरावर आळा घालण्यासाठी सर्व खाजगी दवाखान्यांची तातडीने तपासणी करावी. वैद्यकीय पदवी, रजिस्ट्रेशन नंबर तपासून बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रत्येक गावात अधिकृत डॉक्टरांची यादी ग्रामपंचायतीवर लावावी. लोक बोगस डॉक्टरांकडे जाणार नाहीत यासाठी 108 रुग्णवाहिका व प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा सुधारावी अशी ग्रामीण भागातून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker