कुंडलवाडीत नगरपालिकेचा गरिबांच्या पोटावर पाय ; पर्यायी जागा न देता नगरपालिका प्रशासनाचा छोट्या व्यावसायिकांच्या दुकानावर बुलडोझर
◆छोट्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- गेल्या आठ वर्षांपासून मुख्य बाजारपेठेत आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांवर कुंडलवाडी नगरपालिका प्रशासनाने शेवटी बुलडोझर चालवलाच. आज ८ जून रोजी प्रशासनाने कोणतीही ठोस पर्यायी जागा न देता ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे जगण्याचे साधन हिरावले गेले आहे. नगरपालिका प्रशासनाच्या या मनमानी आणि अमानुष कारवाईविरोधात शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
८ वर्षांनंतर अचानक बेघर करण्याची काय गरज?
तत्कालीन नगरपालिका प्रशासनानेच ८ वर्षांपूर्वी या छोट्या व्यवसायिकांना अधिकृतपणे ही जागा दिली होती. गरिबी आणि रोजगाराची भीषण समस्या पाहता हे व्यावसायिक तिथे प्रामाणिकपणे व्यवसाय करत होते. अचानक कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता थेट पोलिसांचा कडक बंदोबस्त लावून ही दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे प्रशासनाचा ‘गरीब हटाव’चा क्रूर चेहरा समोर आल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
विकासाच्या नावाखाली गरिबांचा बळी…
कुंडलवाडी नगरपालिकेने रस्ता आणि नाली बांधकामाचे कारण पुढे करत ही कारवाई केली. मात्र, यामुळे शहरातील बेरोजगारी आणि गरिबी वाढणार आहे, याकडे प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली. भर उन्हाळ्यात, पावसाळा तोंडावर आलेला असताना या छोट्या दुकानदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
या कारवाईदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, तर कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टूवार यांच्या मदतीने वीज पुरवठा खंडित करून कारवाई पार पाडण्यात आली.
नगरपालिकेतील भाजप सत्ताधारी हे शहरासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी खाजगी सावकारांच्या ले-आउट मध्ये नमो उद्यान व विविध कामे करण्यासाठी वापरत आहेत. दुकानदारांना पर्यायी जागा न देता सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली नगरपालिका प्रशासनाने बुलडोजर चालवले आहे. यामुळे २४ छोटे व्यावसायिक रस्त्यावर आले असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. गरिबांच्या पोटावर पाय देऊन शहराचा कोणता विकास नगरपालिकेतील भाजप सत्ताधारी करणार आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी केला आहे.
आज दि.८ जुन रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण धारकांनी विरोधात कारवाई करण्यात आली असून मुख्य बाजारपेठेतील २४ दुकाने हटवण्यात आली आहेत. या दुकानांना पर्यायी जागा देण्याचा कुंडलवाडी नगरपालिका प्रशासन विचार करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दिली आहे.



