ताज्या बातम्यानांदेडनायगांव

निष्क्रिय पुरवठा निरिक्षण अधिकाऱ्यामुळे नायगाव तालुक्यात वाढला स्वस्त धान्याचा काळाबाजार : तहसीलदारांची बघ्याची भुमिका

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : पुरवठा निरिक्षण अधिकारी भावना जवंजाळ या सकाळी ११ च्या नंतर कार्यालयात मुलांना घेवून येतात त्यांच्यासोबत वेळ घालवतात व चार वाजले कि भुर्र होतात. त्यामुळे नायगाव तालुक्यात स्वस्त धान्याचा प्रचंड काळाबाजार वाढला आहे. परंतु या निष्क्रिय पुरवठा निरिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग तहसीलदार करत आहेत.

पुरवठा निरीक्षण अधिकारी हा महसूल व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील महत्त्वाचा अधिकारी असतो. रेशनिंग, धान्य वितरण, बाजार नियंत्रण ही त्याची मुख्य जबाबदारी असते. हा गट-क संवर्गातील अधिकारी असून तो तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली तालुका स्तरावर काम करतो. स्वस्त धान्य दुकानातील साठा, वाटप व शिल्लक यांची पडताळणी करणे, ई-पॉस मशीनवर झालेले वाटप व प्रत्यक्ष साठा जुळतो का तपासणे त्यांचे काम असून. प्रत्येक महिन्याला किमान २५-३० स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करणे, स्वस्त धान्य दुकानदारांची मासिक बैठक घेणे, गोदामातून दुकानापर्यंत धान्य वाहतुकीवर लक्ष ठेवणे, गळती रोखणे अशी पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याची जबाबदारी आहे.

लाभार्थ्यांना दिले जाणारे धान्य सडके, निकृष्ट दर्जाचे नाही ना याची खात्री करणे. दुकानदार योग्य वजनाने धान्य देतो का, काटा अचूक आहे का ते तपासणे. रेशन न मिळणे, जादा पैसे घेणे, अपमानास्पद वागणूक याबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून अहवाल देणे. नवीन APL/BPL/अंत्योदय शिधापत्रिकेसाठी पात्रतेची चौकशी. बोगस कार्ड शोधून रद्द करण्याची शिफारस करणे. शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंकिंग, मोबाईल अपडेट करून घेणे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशीनवर नोंदणी पूर्ण करून घेणे. घरकुल, उज्ज्वला सारख्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पडताळणी करण्याचे काम आहे.

पुरवठा निरीक्षण अधिकारी हा सामान्य जनतेला वेळेवर, योग्य दरात व चांगल्या दर्जाचे रेशन मिळते का यावर लक्ष ठेवणारा ‘ग्राउंड लेव्हलचा अधिकारी’ असतो. त्यामुळे तक्रार असलेल्या दुकानाची चौकशी करुन दोषी दुकानदाराचा परवाना निलंबन/रद्द करण्याची शिफारस करणे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, काळाबाजार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करणे, अवैध साठा जप्त करणे अदि महत्वाची जबाबदारी पुरवठा निरिक्षण अधिकाऱ्याकडे आहे. मात्र नायगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी भावना जवंजाळ या कार्यालयात सकाळी ११ च्या नंतर लहान मुलांना सोबत घेवून येतात, त्यांच्यासोबत वेळ घालवतात आणि सायंकाळी ४ वाजले कि कधी कधी दुपारच्या सुट्टीतच त्या भुर्र होतात.

पुरवठा निरीक्षण अधिकारी हे तालुकास्तरीय अतिशय महत्वाचे पद असताना जवंजाळ या कधीच लाभार्थ्यांसाठी काम करताना दिसल्या नाहीत, कोणत्या तक्रारीची चौकशी देखील नाही की एखाद्या दुकानाची आजपर्यंत तपासणी केली नाही. हॉटेल, किराणा दुकान, पेट्रोल पंपावर दरफलक लावले आहेत का ते पाहणे त्यांची जबाबदारी असताना त्या आजपर्यंत इकडे फिरकल्या देखील नाहीत. केवळ कार्यालयात येणे मुलाबरोबर वेळ घालवणे व घरी जाणे एवढेच त्या जबाबदारीने काम करत असल्याने त्यांना वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्या, भर बैठकीत खडे बोल सुनावण्यात आले तरीही त्यांच्यात काहीही बदल झाला नाही.

पुरवठा निरिक्षण अधिकारी हे तहसीलदारांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या अधिकारी असून त्यांचे बेजबाबदार वागणे, कामचुकारपणा व निष्क्रियतेमळे नायगाव तालुक्यात राशनच्या धान्याचा काळबाजार वाढला असून या धान्याच्या काळाबाजाराला तेच जबाबदार असतांना त्यांना पाठीशी घालण्याचे काम तहसीलदार करत आहेत त्यामुळे तहसीलदारांच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker