नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; आता सकाळी ८ ते १२:३० पर्यंतच भरणार शाळा

प्रकाश महिपाळे
नांदेड : शैक्षणिक सत्र २०२६-२७ ची सुरुवात झाली असली तरी नांदेड जिल्ह्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता कायम असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची वेळ बदलून ती आता सकाळी ८:०० ते दुपारी १२:३० अशी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार हे आदेश जारी केले आहेत.
पत्रातील मुख्य मुद्दे आणि निर्णय:
उन्हाची तीव्रता कायम: १५ जून २०२६ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे, मात्र जिल्ह्यात अजूनही पाऊस न झाल्याने उन्हाचा कडाका कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य: दुपारच्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शाळांना नियम लागू: हा आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या (मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी) आणि सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय, निमशासकीय, खाजगी) शाळांना पुढील आदेशापर्यंत लागू राहील.
या संदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नांदेडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना पाठवण्यात आले असून, तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रातच (८:०० ते १२:३०) भरवल्या जातील.



