गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज परिवर्तन पुरस्काराने श्याम गायकवाड यांचा गौरव

तानाजी शेळगावकर

नायगाव : सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे लोकप्रिय गायक, पत्रकार तथा नायगाव तालुक्यातील नरसी येथील सुपुत्र श्याम गायकवाड यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज परिवर्तन पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, पत्रकारिता क्षेत्रातील कार्य तसेच कला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नांदेड येथील मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवा संस्था आणि मायडी बहुउद्देशीय सेवा संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समता गौरव पुरस्कार २०२६ अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्याम गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण देत सन्मान केला. यावेळी संस्थेचे माननीय शंकरसिंह ठाकूर, मारोती शिकारे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, नागसेन जिगळेकर, प्रेरणादायी सामाजिक नेतृत्व सुरेश डोणगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा-वेदनांना प्रभावीपणे मांडले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाज परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

श्याम गायकवाड यांनी पत्रकारिता, गायन आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना आवाज दिला आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज परिवर्तन पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याबद्दल श्याम गायकवाड यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker