ग्रामपंचायत कोलंबीचे संगणक परिचालक हणमंत आत्माराम कोकुर्ले यांना ‘आदर्श संगणक परिचालक पुरस्काराने’ सन्मानित
डिजिटल सेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल हणमंत आत्माराम कोकुर्ले यांचा नायगाव प्रशासनाकडून गौरव

प्रकाश महिपाळे
नायगाव :- आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत तत्पर, पारदर्शक आणि उत्कृष्ट डिजिटल सेवा पुरविल्याबद्दल ग्रामपंचायत कोलंबी येथील संगणक परिचालक श्री. हणमंत आत्माराम कोकुर्ले यांना सन २०२५-२६ या वर्षाचा ‘आदर्श संगणक परिचालक (उत्कृष्ट) पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नायगाव येथील पंचायत समिती प्रशासनाच्या आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात हा सत्कार सोहळा पार पडला. नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.पि.एन.वानखेडे, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व विस्तार अधिकारी (पंचायत) पि.एस. जाधव साहेब यांच्या शुभहस्ते श्री. कोकुर्ले यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट डिजिटल सेवेची आणि प्रामाणिक कार्याची पावती…
श्री.हणमंत आत्माराम कोकुर्ले यांनी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना अत्यंत जबाबदारीने व सचोटीने सेवा बजावली आहे. शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार: केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत सहजतेने पोहोचवला. ई-प्रशासकीय कामे: ई-ग्रामस्वराज, घरकुल योजना, पीआरआय (PRI) ॲप, ई-टेंडरिंग आणि डिजिटल सातबारा यांसारखी महत्त्वाची डिजिटल कामे वेळेत आणि अचूकतेने पूर्ण केली. तातडीने दाखले वितरण: ग्रामस्थांना आवश्यक असणारे जन्म-मृत्यू, रहिवासी, उत्पन्न यांसारखे विविध महत्त्वाचे दाखले विनाअडथळा व तातडीने उपलब्ध करून दिले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान: या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कोलंबीला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन तालुका प्रशासनाच्या वतीने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

“हा पुरस्कार सर्वांच्या सहकार्याचे फळ” — हणमंत कोकुर्ले
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री. हणमंत कोकुर्ले म्हणाले “डिजिटल सेवेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची सेवा करताना केलेल्या कामाची पावती म्हणजेच आज मिळालेला हा ‘आदर्श संगणक परिचालक’ पुरस्कार आहे! हा सन्मान केवळ माझा एकट्याचा नसून वरिष्ठ अधिकारी प्रकाश जाधव, गणेश टोणगे (विस्तार अधिकारी, पं.स. नायगाव), ग्रामपंचायत अधिकारी टी.जी.पाटील रातोळीकर, बोंडले साहेब, साईनाथ पाटील चव्हाण साहेब, प्रकाश महिपाळे, गौतम चिंतोरे, शेषराव पा. बेलकर, दीपक बच्छाव, माजी सरपंच प्रल्हाद पा. बैस, कारकून लक्ष्मीकांत कोत्तावार, किरण शिंदे, सैलानी शेख, सर्व सहकारी संगणक परिचालक आणि सर्व कोलंबी ग्रामस्थांच्या सहकार्याचे हे फळ आहे. भविष्यातही नागरिकांना अशीच पारदर्शक सेवा देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”

या गौरव सोहळ्याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी शिवाजी पा. शिंदे, माजी सरपंच शिवदत्त पोतलवाड, अनिल बैस यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात डिजिटल क्रांती प्रभावीपणे राबवून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या श्री. हणमंत आत्माराम कोकुर्ले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, कोलंबी गाव आणि संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



