ज्याच्या खिश्यातील रक्कम जप्त केली तोच आरोपी पोलीस दप्तरी फरार : रामतीर्थ पोलीसांचा अफलातून कारभार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नरसी शंकर नगर रोडवर बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी लाँजमध्ये चालणाऱ्या कुंटनखान्यावर धाड मारली. यावेळी चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. यावेळी लाँजमालक श्रीपत आनंदराव पवळे यांच्या पँटच्या खिशातून 500 च्या 49 नोटा तर 100 च्या 121नोटा जप्त केल्याचे एफआयआर मध्ये नमूद आहे. मात्र ते पोलीस दप्तरी मागच्या एक महिण्यापासून फरार आहेत. आरोपीच्या खिशातून रक्कम जप्त केल्यानंतरही जर आरोपी फरार दाखवल्याने रामतीर्थ पोलिसांच्या या अफरातून कारभाराची जोरदार चर्चा होत आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी शंकर नगर रोडवर राज बार अँड रेस्टॉरंट येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यावरुन बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने दि. 6 एप्रिल रोजी छापा मारला. यावेळी सहा परप्रांतीय मुलींची सुटका केली तर बिलोली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कमल विश्वनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीपत आनंदराव पवळे, संतोष श्रीपत पवळे, शिवराज श्रीपत पवळे आणि शेख सोहेल या चौघांच्या विरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेले बार मालक व लाँज चालक श्रीपत आनंदराव पवळे यांच्या पँटच्या खिशातून 500 च्या 49 नोटा तर 100 च्या 121नोटा जप्त करण्यात आल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.
छापा मारला त्यावेळी श्रीपत आनंदराव पवळे हे उपस्थित होते आणि पोलिसांनी त्यांच्या खिशातून 36 हजार 600 रुपये भेटले असे एफआयआर मध्ये नोंद असताना पवळे हे मागच्या एक महिण्यापासून पोलीस दप्तरी फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनीच जाणीवपूर्वक सोडले नाहीत ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. फरार असलेले श्रीपत पवळे हे अटकपूर्व जामिनासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआर नेच रामतीर्थ पोलिसांना उघडे पाडले असल्याने रामतीर्थ पोलीसांचा फलातून कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सदरची कारवाई बिलोलीचे कर्तव्यदक्ष अधिकारी शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली झाली पण पुढील तपासाच्या बाबतीत त्यांचे नियंत्रण नसावे. त्यांचे नियंत्रण असते तर छाप्यात आढळून आलेल्या सहा आंबटशौकीनांना रात्रभर ठाण्यात बसवून त्यांच्याकडून किती रक्कम उकळली याची तंतोतंत माहिती असतांना ठाणेदारांवर कारवाई तर सोडाच साधी नोटीस देखील देण्याचे धारिष्ट्य दाखवण्यात आले नाही.



