ताज्या बातम्यानांदेडनायगांव

स्थानिक गुन्हे शाखेच्या मोठ्या कारवाईने रामतीर्थ पोलिसांची हप्तेखोरी चर्चेत!

नरशी येथील दोन लॉजवर छापा; ७ महिलांची सुटका, १० आरोपींना अटक आणि २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगांवकर

नायगाव : पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध’ (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २५ जुलै २०२६ रोजी नरशी येथील बसस्थानकासमोरील आशीर्वाद लॉज आणि आनंद लॉजवर धडक कारवाई केली. या धाडीत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात आला असून, ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

नरशी येथील आशीर्वाद आणि आनंद लॉजचा मालक पांडुरंग शिवराम श्रीरगिरे (वय ६६, रा. नरशी) हा महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि बळजबरीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पथकाने दोन सामाजिक कार्यकर्त्यांना ‘बोगस गिऱ्हाईक’ म्हणून लॉजवर पाठवले. त्यांनी इशारा करताच पोलिसांनी दोन्ही लॉजवर एकाच वेळी अचानक धाड टाकली.

पश्चिम बंगाल व नांदेडच्या ७ महिलांची सुटका…
या कारवाईत पश्चिम बंगाल आणि नांदेड परिसरातील ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण २,०४,८०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १५३/२०२६ नुसार ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम-१९५६’ चे कलम ३, ४, ५, ६ सह भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. पांडुरंग शिवराम श्रीरगिरे (वय ६६, लॉज मालक, रा. नरशी)

२. राहुल यशवंता कोलते (वय ४०, रा. चिलपिंपरी, मुदखेड)

३. विश्वांबर व्यंकटी गाडे (वय ३४, रा. चिलपिंपरी, मुदखेड)

४. बालाजी आनंद सूर्यवंशी (वय ३२, रा. नरशी)

५. खाकीबा शिवाजी सूर्यवंशी (वय २६, रा. नरशी)

६. नरसिंग बाबुसिंग ठाकूर उर्फ परदेशी (वय २५, रा. नरशी)

७. प्रवीण दत्तू वारनलवार (वय २०, रा. मदनूर)

८. कृष्णा बालाजी देशपिटवार (वय ३२, रा. तेल्लूर)

९. व्यंकट माधव नारे (वय ४०, रा. नरशी)

१०. विक्की विनोद इंदुरकर (वय ३८, रा. हडको, नांदेड)


ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगावकर, उपअधीक्षक पडवळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले व AHTU च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

रामतीर्थ पोलिसांचे ‘पितळ’ उघडे; हप्तेखोरीची जोरदार चर्चा!
स्थानिक गुन्हे शाखेने थेट येऊन ही मोठी कारवाई केल्यामुळे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. विशेष म्हणजे, नरशी येथील बीट जमादाराचा या अवैध धंद्याला पाठिंबा व अभय असल्याच्या चर्चा नागरिक उघडपणे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांनी या भागात कारवाई केली होती. तरीही रामतीर्थ पोलिसांच्या नाकाखाली हा देहविक्रीचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू झाल्याने स्थानिक बीट जमादारासह पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker