नायगाव : मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या तरुणाने हे सर्व संविधानाच्या विरोधात होत असल्याचा आरोप करुन चक्क ईव्हीएम मशीनच फोडल्याची घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे ४ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी आरोपीला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच निवडणूक विभागासह पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली.
नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे चक्क ईव्हीएम मशीनच फोडण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भय्यासाहेब आनंदराव एडके हा तरुण दुपारी ४ वाजताच्या दरम्यान रामतीर्थ येथील मतदान क्रमांक १०५ येथे मतदानासाठी गेला. मतदान करत असताना हे सर्व संविधानाच्या विरोधात होत असून हे मला मान्य नाही असे म्हणत लोखंडी वस्तुने ईव्हीएम मशीन फोडली.
मतदान अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त असतांना अचानक मतदान करणाऱ्या तरुणाने ईव्हीएम मशीन फोडल्याने एकच खळबळ उडाली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ईव्हीएम फोडणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेवून रामतीर्थ पोलीसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती समजताच बिलोलीचे अधिकारी व पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना लोखंडी वस्तू घेवून तरु मतदान केंद्रात कसा पोहचला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सदर प्रकरणी मतदान केंद्र अधिकारी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उपस्थित झाले होते.