देगलूर आगाराच्या बसला अपघात : 28 जखमी 4 गंभीर

New Bharat Times नेटवर्क
देगलूर : देगलूर आगाराची बस खड्ड्यात कोसळून ४ गंभीर तर २८ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान बलूर टेकडीच्या उतारावर घडली. वाहक महिलेचा पाय मोडला तर चालकाच्या छातीत जबर मार लागला आहे. गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
देगलूर आगाराची बस (क्रं.एम एच 20 बी एल 1152) बुधवारी सायंकाळी पाच वाजता वझरहून हाणेगाव, भुतनहिपरगा, गवंडगाव बलूर मार्गे देगलूरकडे येत असताना बल्लूर टेकडी उताऱ्यावर बसचालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात कोसळली. या अपघातात बस चालक पिराजी ज्ञानोबा सोनकांबळे यांच्या छातीत मुक्का मार लागला तर बस महिला वाहक सुरेखा दत्ता शिंपळे यांची मांडी फ्रॅक्चर झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यासह बसमधील ४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच २८ प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या जखमांनी त्रस्त झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी संकेत गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रूदेव पवार, बीट जमादार सकनुरे, आगारप्रमुख संजय अक्कुलवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरू केले.
या अपघाताच्या घटनेमुळे प्रवासी व स्थानिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी उतारावर वेगावर नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.



